Maharashtra Coronavirus Crisis : राज्यात पुन्हा कठोर निर्बंध, सर्वसामान्यांना लोकल प्रवास बंद, खाजगी बस सेवा 50 टक्के क्षमतेनचं सुरु
Maharashtra Coronavirus Crisis : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कठोर निर्बंध जारी करण्यात आले आहेत. अशातच प्रवासावरही निर्बंध लावण्यात आले आहेत. राज्यांतर्गत प्रवासासाठी ई पासची गरज लागणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र फक्त अंत्यसंस्कार, मेडिकल इमर्जन्सी आणि अत्यावश्यक सेवेसाठीच प्रवास करता येणार आहे.
मुंबई : राज्यात कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं असून कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होताना दिसत आहे. राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अधिक कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यात आज (22 एप्रिल) रात्री आठपासून ब्रेक द चेन अंतर्गत अधिक कडक निर्बंधांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. 22 एप्रिल ते 1 मे पर्यंत हे निर्बंध लागू असणार आहेत. यासाठी शासनाच्या वतीनं नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. 'ब्रेक द चेन' अंतर्गत आज रात्री 8 वाजल्यापासून या नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. यामध्ये अनेक कठोर निर्बंध लागू करण्यात आले असून राज्यांतर्गत प्रवासासाठी ई पासची गरज लागणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र फक्त अंत्यसंस्कार, मेडिकल इमर्जन्सी आणि अत्यावश्यक सेवेसाठीच प्रवास करता येणार, असल्याचंही जाहीर करण्यात आलं आहे.
राज्य सरकारच्या नियमावलीनुसार...
बस सेवा वगळता इतर खासगी प्रवासीवाहतूक केवळ आपात्कालीन सेवेसाठी किंवा वैध कारणांसाठीच वापरता येईल. त्यासाठी चालक अधिक प्रवासी आसनक्षमतेच्या पन्नास टक्के ही कमाल मर्यादा असणार आहे. या प्रवासात आंतर-जिल्हा किंवा एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवासीवाहतूक अपेक्षित नाही तर प्रवाशांच्या निवासस्थानाच्या शहरापुरती मर्यादित राहील. जीवनावश्यक सेवेची पूर्तता किंवा वैद्यकीय आपात्कालीन प्रसंग किंवा अंत्यसंस्कार आणि कुटुंबातील कोणी गंभीर आजारी असल्यास अशा परिस्थितीत आंतरजिल्हा किंवा आंतरशहर प्रवासाला परवानगी दिली जाईल. या आदेशांचा भंग करणाऱ्यांना दहा हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
खासगी बसेसना केवळ 50 टक्के क्षमतेनेच प्रवासी वाहतूक करता येणार. बसमध्ये उभ्याने प्रवासाला बंदी करण्यात आली आहे. प्रवासादरम्यान दोनपेक्षा अधिक थांबे घेता येणार नाहीत. थांब्यांवर उतरणाऱ्या प्रवाशांना 14 दिवस होम क्वॉरंटाइनचे स्टॅम्प मारले जाणार, असल्याचंही या नियमावलीमध्ये सांगण्याक आलं आहे. जर एखाद्या प्रवाशामध्ये कोरोनाची लक्षणं आढळली तर त्याला त्या जिल्ह्यातील किंवा शहरातील कोरोना उपचार केंद्र किंवा रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. प्रवासी उतरण्याच्या ठिकाणी रॅपिड अॅन्टीजन टेस्ट करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे उतरणाऱ्या प्रवाशांच्या हातावर स्टॅम्प मारण्याच्या निर्बंधातून सूट द्यायची की नाही? हे स्थानिक प्रशासनाने त्या भागातील परिस्थितीनुसार ठरवायचे आहे.
लांब पल्ल्याच्या गाड्या किंवा राज्य परिवहनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची माहिती संबंधित प्रवासी उतरणार असलेल्या ठिकाणच्या प्रशासनाला द्यावी लागणार आहे. या सर्व प्रवाशांना 14 दिवसांचा होम क्वॉरंटाइनचा स्टॅम्प मारावा लागणार आहे. प्रवाशांची थर्मल स्कॅनरद्वारे स्कॅनिंग करून त्यांच्यात कोरोनाची लक्षणं आढळल्यास त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागणार. या सर्व नियमांचे पालन करण्याचे किंवा ते शिथिल करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत.
सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवास बंद
केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आलेली आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या ओळखपत्रावर त्यांना तिकीट किंवा पासेस उपलब्ध होणार आहेत. सर्व आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स, नर्सेस, लॅब तंत्रज्ञ, रुग्णालय तसेच मेडिकल क्लिनिकमधील कर्मचाऱ्यांना ओळखपत्रावर रेल्वे, मोनो, मेट्रोतून प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. तसेच आजारावरील उपचारांसाठी ती व्यक्ती आणि त्याच्यासोबत एका व्यक्तीलाच लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. राज्य सरकारी परिवहन सेवेतही 50 टक्के प्रवाशांनाच प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Maharashtra Coronavirus Crisis : लग्न समारंभासाठी राज्यात नवे निर्बंध; 25 जणांच्या उपस्थितीत केवळ दोन तासात उरकावं लागणार 'शुभ मंगल'
- Maharashtra Coronavirus Crisis : 'ब्रेक द चेन' अंतर्गत राज्यात कठोर निर्बंध; शासनाकडून नवी नियमावली जारी, काय सुरु अन् काय बंद?
- Maharashtra Coronavirus Crisis | 22 एप्रिलपासून 1 मेपर्यंत राज्यात कडक निर्बंध, सरकारकडून नव्या नियमांची घोषणा