Maharashtra Coronavirus Crisis | 22 एप्रिलपासून 1 मेपर्यंत राज्यात कडक निर्बंध, सरकारकडून नव्या नियमांची घोषणा
राज्यात 22 एप्रिलपासून 1 मे पर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या संदर्भात सरकारकडून नवीन नियमावली घोषित करण्यात आली आहे.
मुंबई : राज्यात उद्या (22 एप्रिल) संध्याकाळी आठपासून ब्रेक द चेन अंतर्गत अधिक कडक निर्बंधांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. 22 एप्रिल ते 1 मे पर्यंत हे कडक निर्बंध असणार आहेत. राज्यात सध्या कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र, तरीही रुग्णसंख्या आटोक्यात येताना दिसत नाही. त्यामुळे राज्य सरकारकडून आणखी नियम कठोर करण्यात आले आहेत.
काय आहेत महत्वाचे नियम?
- सर्व सरकारी कार्यलयात केवळ 15 टक्के उपस्थिती राहणार. अत्यावश्यक सेवेतील कार्यालयांमध्ये 50 टक्के कर्मचाऱ्यांना काम करता येणार आहे. मात्र, आवश्यकतेनुसार या ठिकाणी 100 टक्क्यांपर्यंत कर्मचारी वाढवता येणार आहेत.
- लग्नकार्यासाठी फक्त 25 लोकच उपस्थित राहू शकतात. कुठल्याही हॉलमध्ये 2 तासांच्या आत लग्नकार्य उरकावं लागणार. या नियमांचे उल्लघन केल्यास 50 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.
- खासगी वाहतुकीसाठी ड्रायव्हरसह फक्त 50 टक्के प्रवाशांना परवानगी देण्यात आलीय, नियमांचं उल्लंघन झाल्यास 10 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.
- लोकल ट्रेनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच प्रवासाची मुभा. 50 टक्के लोकांना उभं राहून प्रवास करता येणार.
- खासगी व सार्वजनिक वाहतूकही केवळ अत्यावश्यक लोकांसाठीच.
- एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात नागरिकांना प्रवेश बंदी. मात्र सबळ कारण असेल तर प्रवेश दिला जाणार. अत्यावश्यक सेवेतील लोकांना मात्र मुभा.
- उद्या रात्री 8 वाजल्यापासून 1 मे च्या सकाळी 7 पर्यंत राज्यात कडक लॉकडाऊन.
- किराणामालाची दुकाने, भाजीविक्री सकाळी सात ते अकरा या वेळेत सुरू राहणार.
राज्यात आज विक्रमी 67,438 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत हजाराने वाढ होत असल्याचं चित्र आहे. आज 67 हजार 468 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज 54 हजार 985 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 32 लाख 68 हजार 449 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात एकूण 6 लाख 95 हजार 747 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.15 टक्के झाले आहे.
राज्यात आज एकूण 568 रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. सध्या मृत्यूदर 1.54 टक्के आहे. आतापर्यंत एकूण 61 हजार 911 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज नोंद झालेल्या 568 मृत्यूंपैकी 303 मृत्यू मागील 48 तासातील आहेत. तर 160 मृत्यू मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 105 मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीतील आहेत.