पंकजा-प्रीतम विरुद्ध धनंजय मुंडे! बीडमध्ये एकीकडे कोरोनाचा कहर दुसरीकडे मुंडे भाऊबहिणींचं ट्विटरवॉर
बीडमध्ये सर्वात कमी लस मिळाल्या असल्याचं सांगत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांनी आरोप केले आहेत. यावरुन मंत्री धनंजय मुंडे यांनी त्या दोघींनाही प्रत्युत्तर दिलं आहे.
मुंबई : बीड जिल्ह्यामध्ये दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय तर दुसरीकडे रेमडेसिवीर औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. तर केंद्राकडून आलेल्या लसींमध्ये बीड जिल्ह्याला सर्वात कमी लस मिळाल्या असल्याचं सांगत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आरोग्यमंत्र्यांना पत्र पाठवून खेद व्यक्त केला आहे. तसंच खासदार प्रीतम मुंडे यांनी देखील ट्विटरवर मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांना टॅग करत असमतोल दूर करावा अशी मागणी घातली आहे. तर दुसरीकडे मंत्री धनंजय मुंडे यांनी मात्र दोन्ही बहिणींचे आरोप फेटाळून लावले आहेत. सोबतच पूर्ण माहिती घेऊन एखादं पत्र पंतप्रधानांना लिहून लसींचा पुरवठा वाढवण्याचा आग्रह करा, असा सल्लाही दिला आहे.
बीड जिल्ह्याला मिळाले केवळ लसीचे केवळ 20 डोस
केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला आलेल्या 2 लाख डोसेसपैकी बीडला इतर जिल्हयाच्या तुलनेत केवळ 20 लसी मिळाल्या आहेत, ही अतिशय खेदजनक बाब असून पालकमंत्र्यांचं लक्ष कुठयं? असा सवाल पंकजा मुंडे यांनी केला आहे. याकडे आपण गांभिर्याने लक्ष घालून पुरेसे डोसेस आणि इंजेक्शन उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी त्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचेकडे पत्राद्वारे केली आहे.
यावर धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना उत्तर दिलं आहे. त्यांनी म्हटलंय की, ताईसाहेब, मुख्यमंत्री किंवा आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहिण्याऐवजी पूर्ण माहिती घेऊन एखादं पत्र पंतप्रधानांना लिहून लसींचा पुरवठा वाढवण्याचा आग्रह करा, जेणेकरुण आपली कोरोना विरुद्धच्या लढाईत मदत होईल. यावर पंकजा मुंडे यांनी पुन्हा ट्वीट करत धनंजय मुंडेंना उत्तर दिलं आहे. त्यांनी म्हटलंय की, राज्याच्या भल्यासाठी पंतप्रधान, जिल्ह्याच्या भल्यासाठी मुख्यमंत्री आणि पवार साहेबांनाही पत्र लिहीन. दखल ही घेतली जाईल! तुम्ही त्यांनी दिलेल्या संधीचा तरी सन्मान करा. तुम्ही बीडमध्ये दमडीही आणली नाही. विमा, विकास निधी, अनुदान काही नाही. माफिया मात्र आणले. जुन्या निधीचे काम तरी करा, उद्घाटन करा, हक्क तुम्हाला आहेच भाऊ!, अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे.
राज्याच्या भल्यासाठीPM,जिल्ह्याच्याCM आणि पवार साहेबांना ही पत्र लिहीन दखल ही घेतली जाईल!तुम्ही त्यांनी दिलेल्या संधीचा तरी सन्मान करा.तुम्ही बीडमध्ये दमडीही आणली नाही.विमा,विकास निधी,अनुदान काही नाही,माफिया मात्र आणले.जुन्या निधीचे काम तरी करा,उद्घाटन करा हक्क तुम्हाला आहेच भाऊ! pic.twitter.com/H6dgMPaFFL
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) April 16, 2021
खासदार प्रीतम मुंडे यांना धनंजय मुंडेंचं सविस्तर उत्तर
खासदार प्रीतम मुंडे यांनी केंद्रातून राज्यासाठी आलेल्या 2 लाख लसीपैकी बीडच्या वाटणीला केवळ 20 लसी हे निषेधार्ह आहे. हा असमतोल आपणच दूर करावा, अशी मागणी मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांकडे केली. कारण माफियाची पाठराखण करणाऱ्या बीडच्या मंत्र्यांकडून जिल्हा काही अपेक्षा ठेवू शकत नाही, असा आरोप त्यांनी केला.
केंद्रातून राज्यासाठी आलेल्या 2 लाख लसीपैकी बीडच्या वाटणीला केवळ 20 लसी हे निषेधार्ह आहे. हा असमतोल आपणच दूर करावा @CMOMaharashtra @rajeshtope11
— Dr. Pritam Munde (@DrPritamMunde) April 15, 2021
कारण माफियाची पाठराखण करणाऱ्या बीडच्या मंत्र्यांकडून जिल्हा काही अपेक्षा ठेवू शकत नाही@drharshvardhan pic.twitter.com/Fo8ssiltcN
यावर धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे की, अनेक महिने विश्रांतीनंतर अचानक जाग आली की बाहेरच्या अनेक गोष्टींची माहितीच नसते. केंद्राने राज्याला दिलेल्या 2 लाख लसी या कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोससाठी आहेत,त्यामुळे शिल्लक लसींची माहिती घेऊन त्याप्रमाणात सर्व जिल्ह्यांना लसी वाटण्यात आल्या.हे काहींना ज्ञात नसेल. जिल्ह्यात लसीकरणाचे दोन्ही कंपन्यांचे मिळून 149473 नागरीकांना पहिले तर 19732 नागरिकांना दुसरे डोस देण्यात आले आहेत.हे प्रमाण अन्य जिल्ह्याच्या सरासरीच्या तुलनेत अधिक आहे, हेही आपल्याला ज्ञात नसेलच! राजकारण इतरत्र जरूर करा,पण कृपया जिथे लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे तिथं नको. कोव्हॅक्सिनच्या नव्याने प्राप्त 2 लाख लसींचा वितरणासह शिल्लक असलेल्या व आवश्यक असलेल्या लसींची सविस्तर आकडेवारी आपल्यासाठी देत आहे! आपण शेअर केलेल्या 20 लसींच्या यादीत जालना-सोलापूर शून्य आहे,आरोग्यमंत्री स्वतःच्या जिल्ह्यात लस मिळवू शकले असते हा साधा प्रश्न आपल्याला पडू नये? असा सवाल धनंजय मुंडेंनी केला आहे.
अनेक महिने विश्रांतीनंतर अचानक जाग आली की बाहेरच्या अनेक गोष्टीची माहितीच नसते. केंद्राने राज्याला दिलेल्या 2 लाख लसी या कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोससाठी आहेत,त्यामुळे शिल्लक लसींची माहिती घेऊन त्याप्रमाणात सर्व जिल्ह्यांना लसी वाटण्यात आल्या.हे काहींना ज्ञात नसेल. @DrPritamMunde pic.twitter.com/9EjHxh1Rqp
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) April 16, 2021