बीडमध्ये वाळू माफियांची गुंडागर्दी; तहसीलदारांच्या पथकावर हल्ला करत ट्रॅक्टर पळवून नेले!
Maharashtra Beed Sand mafia : बीडमध्ये अवैध वाळू घेऊन जाणारं पकडलेलं ट्रॅक्टर सोडवण्यासाठी तहसीलदाराच्या पथकावर वाळू माफियांनी हल्ला केला आहे. ही घटना बीडच्या साक्षाळपिंप्री गावाजवळ आज घडली आहे.
बीड : बीडमध्ये अवैध वाळू घेऊन जाणारं पकडलेलं ट्रॅक्टर सोडवण्यासाठी तहसीलदाराच्या पथकावर वाळू माफियांनी हल्ला केला आहे. ही घटना बीडच्या साक्षाळपिंप्री गावाजवळ आज घडली आहे. बीडचे तहसीलदार सुशांत शिंदे यांच्या आदेशाने पथकातील 3 तलाठ्यांनी सिंदफना नदीतील वाळू एका ट्रॅक्टरमध्ये घेऊन जात असताना पकडली. यादरम्यान कारवाईसाठी संबंधित ट्रॅक्टर बीडला घेऊन येत असताना 8 ते 10 दुचाकीवर आलेल्या वाळू माफियांनी तलाठ्यांना धक्काबुक्की करत हल्ला चढवत ट्रॅक्टर पळवून नेले.
या मारहाणीत तीन तलाठी किरकोळ जखमी झाले आहेत. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपींना तात्काळ अटक न केल्यास कामबंद करणार असल्याचा इशारा तलाठी संघटनेने दिला आहे. दरम्यान दिवसेंदिवस बीड जिल्ह्यात वाळू माफियांकडून होणारे हल्ले वाढल्याने प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी काय करतायत? असाच प्रश्न निर्माण झाला आहे.
प्रत्यत्रदर्शी अधिकाऱ्यांनी सांगितलं की, आम्ही पथक घेऊन संबंधित ठिकाणी गेलो होतो. तिथं हे ट्रॅक्टर आढळलं. त्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही घेऊन येत असताना त्यांनी आमच्यावर मारहाण करत हल्ला केला. हल्ला करुन पकडलेले ट्रॅक्टर ते लोकं घेऊन गेले. या मारहाणीत तलाठी जखमी झाले आहेत. यापुढं अशा कारवाई करताना पोलिस प्रशासनाची सुरक्षा असेल तरच आम्ही कारवाई करु. आमच्या जीविताला धोका आहे, त्यामुळं पोलिस प्रशासन यापुढं सोबत देण्यात यावं, अशी मागणी अधिकाऱ्यांनी केली आहे.