Maharashtra Assembly Winter Session: फक्त शिंदे गटाचे मंत्री विरोधकांच्या निशाण्यावर? विरोधी पक्षनेते अजित पवारांनी स्पष्ट सांगितले
Maharashtra Assembly Winter Session: विरोधकांनी फक्त शिंदेच गटाच्या मंत्र्यांना लक्ष्य केले आहे का, अशी चर्चा सुरू असताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यावर भाष्य केले आहे.
Maharashtra Assembly Winter Session: विधीमंडळ हिवाळी अधिवेशनात (Maharashtra Winter Session) विरोधी बाकावरील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) पहिल्याच दिवसापासून आक्रमक झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसापासून विरोधकांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे सरकार काहीसे बॅकफूटला आल्याचे चित्र होते. विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना एनआयटी भूखंड प्रकरणी घेरण्याचा प्रयत्न केल्यानंतर आणखी दोन मंत्र्यांविरोधात विरोधक आक्रमक झाले आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही मंत्री शिंदे गटातील आहे. त्यामुळे शिंदे गट विरोधकांच्या निशाण्यावर आले का, अशी चर्चा रंगली आहे. तर, दुसरीकडे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विरोधकांनी एनआयटी भूखंड विक्रीत घोटाळा केल्याचा आरोप केला. त्यानंतर गायरान जमिनीच्या व्यवहाराप्रकरणी आणि सिल्लोड कृषी महोत्सवाच्या मुद्यावर सोमवारी कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्याविरोधात विरोधक आक्रमक झाले होते. त्यांनी कृषी मंत्री सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात गदारोळ झाला. त्यानंतर विद्यमान मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्याविरोधातदेखील आज विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. संजय राठोड हे महसूल राज्यमंत्री असताना त्यांनीदेखील गायरान जमीन विक्री केली असल्याचा आरोप करण्यात येत आहेत. शिंदे गटातील मंत्री अडचणीत येत असल्याचे चित्र आहे.
अजित पवार यांनी काय म्हटले? (Ajit Pawar Leader Of Opposition)
फक्त शिंदे गटातील मंत्री विरोधकांच्या निशाण्यावर आहेत का, अशी चर्चा सुरू असताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावर भूमिका स्पष्ट केली. विधान भवनाच्या आवारात माध्यमांशी चर्चा करताना अजित पवार यांनी म्हटले की, अजूनही काही मंत्र्यांशी संबंधित प्रकरणाची माहिती मिळाली आहे. योग्य कागदपत्रे हाती लागल्यानंतर याबाबत सभागृहात मुद्दा उपस्थित करण्यात येईल असे त्यांनी म्हटले. कोणत्याही विशिष्ट मंत्र्यांना लक्ष्य करण्यात येत नसून जी माहिती समोर येत आहे, त्यानुसार सरकारला धारेवर धरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अब्दुल सत्तार काय उत्तर देणार?
अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. काल (26 डिसेंबर) सभागृहात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांसह (Ajit Pawar) विरोधकांनी राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यांच्या आरोपाला आज अब्दुल सत्तार हे सभागृहात उत्तर देणार आहेत.