Maharashtra Assembly Winter Session : हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस, नागपुरात 12 मोर्चे निघणार
Winter Session : राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. आजच्या दिवशी नागपुरात 12 मोर्चे निघणार आहेत.
Maharashtra Assembly Winter Session : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा (Maharashtra Assembly Winter Session) आज (22 डिसेंबर) चौथा दिवस आहे. आजच्या चौथ्या दिवशी नागपुरात (Nagpur) 12 मोर्चे निघणार आहेत. यातला पोलीस पाटील संघटनेचा मोर्चा महत्वाचा असणार आहे. तसेच कोकणातील रिफायनरी (Refineries) विरोधक आज नागपुरात एक दिवसाच आंदोलन केलं जाणार आहे. 54 हजार कोटींच्या पुरवण्या मागण्यांवर दोन दिवस चर्चा झाल्यानंतर आता आज सभागृहात पुरवण्या मागण्या मंजूर करण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, विरोधक आक्रमक
दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून नागपूर न्यास जमीन विक्रीच्या प्रकरणाच्या मुद्यावरून विरोधकांनी सरकारला घेरण्याच्या प्रयत्न केला आहे. विरोधक आज विधीमंडळ अधिवेशनाच्या चौथ्या दिवशीही आक्रमक होण्याची शक्यता आहे. काल तिसऱ्या दिवशीचे सत्र सुरु होण्यापूर्वी सत्ताधारी भाजप-शिंदे गटाचे आमदार आणि विरोधक पुन्हा आमने सामने आले होते. विठ्ठलाचे नाही धरले पाय, मविआचे करायचे काय, असे फलक सत्ताधारी आमदारांच्या हातात होते. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या आमदारांकडून विधान भवनाच्या पायऱ्यांवर राज्य सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या. राज्य सरकारच्या मनमानी काराभाराविरोधात महाविकास आघाडीचे आमदार एकत्र आल्याचे पाहायला मिळालं. भूखंड गैरव्यवहार प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच बोगस आदिवासी कायम करून खऱ्या आदिवासींवर अन्याय करणाऱ्या सरकारचा निषेध, असे फलक घेऊन अकोले येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी विधानभवन परिसरात नारेबाजी केली. सरकारचा जाहीर निषेध असो अशा आशयाचे फलक गळ्यात लटकवून त्यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर निदर्शनं केली.
विधिमंडळ अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विरोधी पक्षाने सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. एनआयटी (नागपूर सुधार प्रन्यास) भूखंड घोटाळा विधानभवनात (Vidhan Bhavan Nagpur) गाजला. खोके घेऊन भूखंड ओके करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा (CM Eknath Shinde) धिक्कार असो, राजीनामा द्या, राजीनामा द्या.. मुख्यमंत्री राजीनामा द्या... अशा घोषणांनी तिसऱ्या दिवशी विधानभवन परिसर दणाणून सोडला.
भूखंडाचा श्रीखंड खाणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, ईडी सरकार हाय हाय, भ्रष्ट सरकार हाय हाय, खोके सरकार हाय हाय, अशा घोषणा देण्यात आल्या होत्या.
मुख्यमंत्र्यांनी आरोप फेटाळले
नागपूर न्यास प्रकरणात आपण कोणताही गैरव्यवहार केला नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. भूखंड विक्रीबाबत घेतलेला निर्णय हा नियमांनुसार घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. हे प्रकरण कोर्टात आहे, याची माहिती आपल्याला देण्यात आली नव्हती असेही त्यांनी म्हटले. आम्ही तुमच्या सारखे नसून बिल्डरकडून 350 कोटी आम्ही लुटून कोणाच्या घशात घातलेले नाही असा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हल्लाबोल केला होता.
महत्त्वाच्या बातम्या:
Winter Assembly Session : खोके घेऊन भूखंड ओके करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, मुख्यमंत्री राजीनामा द्या; घोषणांनी परिसर दणाणला