(Source: ECI/ABP News/ABP Majha)
विरोधकांनी आरशात पाहावं, जनतेला काय हवं हे त्यांच्या लक्षात आलं तर बरं होईल; फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेला काय हवंय हे विरोधी पक्षाच्या लक्षात आलं तर बरं होईल असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी विरोधी पक्षांवर टीका केली आहे.
Maharashtra Assembly Winter Session : जनतेला काय हवंय हे विरोधी पक्षाच्या लक्षात आलं तर बरं होईल असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी विरोधी पक्षांवर टीका केली आहे. महाराष्ट्राच्या हिताच्या प्रश्नांवर आम्ही सकारात्मक चर्चा करु. राज्याच्या विकासाच्या संदर्भातील महत्वाचे निर्णय या अधिवेशनात होतील असे फडणवीस म्हणाले. विरोधकांनी आरशात पाहिलं पाहिजे आणि मग बोललं पाहिजे. सत्ताधारी सर्व प्रश्नांवर चर्चा करण्यास तयार असल्याचे फडणवीस म्हणाले.
नुकतंच जे चक्री वादळ चार राज्यात येऊन गेले त्याचा परिणाम म्हणून आपल्या विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ऑरेंज अलर्ट देखील देण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्व यत्रणांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या असल्याचे फडणवीस म्हणाले. भरपाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. आज विरोधकांनी चहापानावावर बहिष्कार घातला आहे. पुढच्या वेळेस सुपारी पान ठेवावे लागेल तर विरोधक पुढच्या वेळेला येतील असे फडणवीस म्हणाले.
लोकशाहीमध्ये जनता जनार्दनाचा कौल महत्त्वाचा
चार राज्यातल्या ज्या काही निवडणुका आणि तीन राज्यातले निकाल जे लागले त्यामुळे त्यांची परिस्थिती अशी झालेली असं वाटतंय. ठीक आहे लोकशाहीमध्ये जनता जनार्दनाचा कौल महत्त्वाचा असतो असे फडणवीस म्हणाले. जे मोदीजींवर टीका करत होते मोदीजींच्या करिष्मा संपला आता बघा काय होतंय ते असं म्हणत होते, त्यांना या देशातल्या जनतेने दाखवून दिलं या राज्यांमध्ये घवघवीत यश मिळालं आहे. जनता जनार्दनाने मोदी गॅरेंटीवर विश्वास ठेवला आहे. पुढचं काय बोलत नाही मी आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मोदीजी पुन्हा प्रधानमंत्री होतील याची गॅरंटी देऊन टाकली आहे.
विदर्भातल्या जनतेला अधिवेशनांमधून न्याय देण्याचं काम नक्की केलं जाईल असे फडणवीस म्हणाले. जनतेला न्याय देताना आमच्या सरकारला एक विशेष आनंद होईल. विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस आणि कालबद्ध रीतीने जे काही प्रकल्प आहेत, योजना आहेत, ते पूर्ण केले जातील असं आश्वासन देखील फडणवीस यांनी दिले. विरोधकांनी चहापानावर नेहमीप्रमाणे बहिष्कार घातला आहे.
मराठा आणि ओबीसीबाबत सरकारची भूमिका प्रामाणिक
मराठा आणि ओबीसीबाबत सरकारची भूमिका प्रामाणिक आहे. मराठा आरक्षण देण्याचे काम सरकार करेल असे फडणवीस म्हणाले. सर्वांना विश्वासात घेऊन आम्ही सांगितले आहे आरक्षण देणार आहोत. काही लोकांच्या चुकामुळं मागच्या वेळी आरक्षण गेल्याचे फडणवीस म्हणाले. दोन्ही समाजात तेढ वाढवण्याचा प्रयत्न काही जण करतात. जो दगड मारणारा होता त्याच्यासोबत फोटो कुणाचा होता असेही फडणवीस म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: