Maharashtra Assembly Session : खारघर दुर्घटनेचा मुद्दा विधानपरिषदेत उपस्थित, सत्ताधारी-विरोधकांमध्ये खडाजंगी, सभागृहात सुधीर मुनगंटीवार यांनी दिली महत्त्वाची माहिती
Maharashtra Assembly Session : खारघरमध्ये झालेल्या घटनेचा मुद्दा विधानपरिषदेमध्ये विरोधकांकडून उपस्थित करण्यात आला. त्यावर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांना चोख उत्तर दिलं आहे.
Maharashtra Assembly Session : खारघरच्या (Kharghar) घटनेमध्ये मृतांच्या नातेवाईकांना धर्माधिकारी कुटुंबियांनी किती मदत केली असा मुद्दा विधानपरिषदेमध्ये (Vidhanparishad) उपस्थित करण्यात आला. यावर सुधीर मुनगंटीवर (Sudhir Mungantiwar) यांनी विरोधकांना चोख उत्तर दिलं आहे. आमदार कपिल पाटील यांनी मृत श्री सदस्यांच्या नातेवाईकांना धर्माधिकारी कुटुंबियांनी किती मदत केली असा सवाल विचारला. यावर उत्तर देताना सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहाला अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं की, 'मृत श्री सदस्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत धर्माधिकारी कुटुंबियांनी केली आहे.'
काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी खारघर दुर्घटनेचा उपस्थित केला. यावर बोलताना भाई जगताप यांनी म्हटलं की, "त्यादिवशी 42 डिग्री तापमान होतं. तरीही कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. हा सत्तेचा माज चालणार नाही. हे सगळं सत्ताधारी पक्षाच्या मुळावर येणार आहे. तसेच यामध्ये एक समिती स्थापन केल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर समितीला देखील आणखी वेळ वाढवून देण्यात आला. निवृत्त न्यायाधिशांच्या मार्फत चौकशी करण्याची मागणी आम्ही केली. पण ती देखील मान्य केली नाही."
सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?
यावर बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी न्यायालयीन चौकशी का केली नाही याचं स्पष्टीकरण दिलं. नैसर्गिक किंवा मानवी दोषांमध्ये आपण कोणतीही चौकशी करत नसल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं. यासंदर्भात त्यांनी अनेक घटनांचा देखील उल्लेख केला. तर तहसीलदार, जिल्हाधिकारी या सगळ्यांनी जाऊन पाहणी केली. असं देखील सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.
...मग खासगी रुग्णालयात अॅडमिट का केलं? : अंबादास दानवे
तर ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी देखील या मुद्द्यावरुन सरकारला घेरलं. डॅाक्टरांची मोठी व्यवस्था होती तर मग खाजगी हॅास्पिटलमध्ये त्यांना का अॅडमिट केले असा सवाल अंबादास दानवे यांनी सरकारला विचारला आहे. तर कार्यक्रम सरकारचा होता की खासगी संस्थेचा असं म्हणत अंबादास दानवे यांनी सरकारवर निशाणा साधला. हा विषय गृह विभागाचा आहे त्यामुळे सांस्कृतिक विभागाचा यामध्ये कोणताही भाग नाही असं म्हणत अंबादास दानवे यांनी सुधीर मुनगंटीवार यांना टोला लगावला आहे.
शशिकांत शिंदे यांच्याकडून राजीनाम्याची मागणी
शशिकांत शिंदे यांनी या घटनेची पूर्ण जबाबदारी घेऊन मंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी केली आहे. यावर उत्तर देत सुधीर मुनगंटीवार यांनी मांढरदेवी दुर्घटनेचा आणि गुवारी दुर्घटनेचा संदर्भ दिला. मांढरदेवी दुर्घटना घडली तेव्हा मंत्र्यांनी राजीनामा दिला होता का असा त्यांनी सवाल विचारला तर गुवारी दुर्घटना यावेळेस शरद पवारांनी राजीनामा दिला होता का? हा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. तर 2008 ला खारघर मैदानात महाराष्ट्र भूषण कार्यक्रम झाला होता तेव्हा विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते तेव्हा तुम्ही एवढे मदतीला धावला का असं विचारत मुनगंटीवार यांनी शशिकांत शिंदे यांना टोला लगावला आहे.