Madha Lok Sabha Constituency : माढामध्ये सिंहाविरुद्ध आणखी एक सिंह रिंगणात उतरण्यास सज्ज; मेहबूब शेख यांचे जयंतरावांना साकडं
माढाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. अन्य मतदारसंघांमधील नाराजी आणि वाद मिटवण्यात देवेंद्र फडणवीस यांना यश आलं असलं, तरी माढामधील तिढा मात्र सुटलेला नाही.
Madha Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणुकीसाठी माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपच्या पहिल्याच यादीमध्ये रणजिसिंह निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर कमालीचा रोष पाहायला मिळाला आहे. कोणत्याही परिस्थितीत रणजितसिंह निंबाळकर यांची उमेदवारी बदलावी, यासाठी अजित पवार गटाकडून तसेच भाजपमधील काही स्थानिक नेत्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर माढाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. अन्य मतदारसंघांमधील नाराजी आणि वाद मिटवण्यात देवेंद्र फडणवीस यांना यश आलं असलं, तरी माढामधील तिढा मात्र सुटलेला नाही. धैर्यशील मोहिते पाटील हे भाजपचेच असून ते कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवण्यासाठी ठाम आहेत. गेल्या काही दिवसांपासून अडगळीत पडल्याची भावना मोहिते पाटील गटामध्ये आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये काहीही करून उतरायचे अशी मानसिकता केली आहे.
अभयसिंह जगताप यांच्या उमेदवारीसाठी आग्रह
या सर्व पार्श्वभूमीवर रणजितसिंह निंबाळकर यांच्या उमेदवारीला धक्का लावण्यात आला नसला, तरी चर्चा मात्र काही थांबलेली नाही. असे असतानाच महाविकास आघाडीकडून सुद्धा कोण उमेदवार असणार याची चर्चा सुरुच आहे. महाविकास आघाडीकडून सर्वप्रथम शरद पवार यांनी माढ्यामध्ये महादेव जानकर यांच्या उमेदवारीसाठी गळ टाकला होता. मात्र, जानकारांना त्या ठिकाणी उमेदवारी मिळणार असे दिसून येताच महायुतीकडून त्यांना परत बोलावून परभणीमधून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता माढामध्ये कोण उमेदवार असणार याची चर्चा रंगली आहे.
दरम्यान, शरद पवार गटाकडून माढामधून अभयसिंह जगताप यांच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांनी जोर लावला आहे. अभयसिंह जगताप यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. त्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पत्र लिहून जगताप यांना उमेदवारी द्यावी असं म्हटलं आहे.
काय म्हटलं आहे पत्रात?
त्यांनी म्हटलं आहे की युवकांना संधी देणारा पक्ष म्हणून आपल्या पक्षाची ओळख आहे. गेली बरेच वर्षे तळागाळात, पक्ष संघटनेत अभयसिंह जगताप हे भरीव कार्य करीत असून एक उच्चशिक्षित, प्रामाणिक, एकनिष्ठ आणि समाजातील सर्व घटकांना सांभाळून घेणारा एक युवा चेहरा आहे. माढा मतदारसंघातून वाढती लोकप्रियता पाहता लोकांनी अभय जगताप यांच्या उमेदवारी जोर धरला असून संघटनेत तन-मन-धनाने योगदान देणाऱ्या तरुण चेहऱ्याला संधी मिळावी ही महाराष्ट्र युवक कार्यकारिणीच्या वतीने व युवक अध्यक्ष नात्याने मागणी करत आहे, असं पत्रामध्ये म्हटलं आहे.
तत्पूर्वी, जानकरांना उमेदवारीची शरद पवार यांनी चाचपणी करताना अभयसिंह जगताप यांनी जानकर लढण्यासाठी तयार नसल्यास मी लढण्यासाठी तयार असल्याचे जगताप यांनी म्हटले होते. माढा लोकसभेचा आढावा घेण्यासाठी शरद पवार यांच्याकडून अभयसिंह जगताप यांना सूचना देण्यात आल्या होत्या. त्या संदर्भातील अहवाल जगताप यांनी शरद पवार यांना सादर केला आहे. दरम्यान जगताप यांनी काही दिवसांपूर्वी मोहिते पाटील यांची भेट घेतली होती. मात्र, त्यांनी पाठिंबा देण्याबाबत कोणतीही वाचता केली नव्हती. ते स्वतःच निवडणूक लढवण्यासाठी ठाम आहेत. त्यांना तुतारी हाती घ्यावी यासाठी कार्यकर्त्यांचा दबाव आहे
इतर महत्वाच्या बातम्या