Latur News : लातूर शहराला पिवळसर पाण्याचा पुरवठा, नागरिकांतून संताप
Latur News Update : लातूर शहरात पिवळसर आणि दुर्घंधीयुक्त पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांतून संपात व्यक्त होत आहे.
Latur News Update : लातूर शहरात आठ दिवसाआड पाणी पुरवठा होतो. वेळापत्रकानुसार शहराच्या विविध भागात रोज पाणी पुरवठा करण्यात येत असतो. परंतु, गेल्या काही दिवसांपासून शहरात पिवळसर आणि दुर्घंधीयुक्त पाणी पुरवठा होत आहे.
लातूर शहराला मांजरा धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. पाईपलाईनद्वारे मांजरा धरणातून पाणी हरगुळ जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत येते. येथे त्यावर शुद्धीकरण प्रक्रिया होते. त्यानंतर संपूर्ण शहराला पाणी पुरवठा केला जातो. मात्र, येथील गेटवॉल आणि त्याच्या पुढील पाईपलाईनच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी अनेक वर्षांपासून कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे नळाद्वारे येणाऱ्या शुद्ध पाण्यात धरणातील पाणी मिसळत आहे.
नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सात दिवसांपासून शहरात पिवळे पाणी येण्यास सुरुवात झाली. त्यानंतर नागरिकांनी याबाबत तक्रारही केली. नागरिकांच्या तक्रारीनंतर प्रशासनाने पाण्याची तपासणी करून पाणी पिण्यालायक आहे असा अहवाल दिला. मात्र याबाबत लातूरकरांनी आंदोलनाची भूमिका घेतली. त्यामुळे आज शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला आहे.
महानगरपालिका प्रशासनाकडून जलशुद्धीकरण केंद्रावरील गेटवॉल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे आज होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
लातूर शहर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विजयकुमार चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, "हरंगुळ येथील जलशुद्धीकरण केंद्रावर दोन सेटलिक टँक आहेत. यापैकी एका टँकच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. दोन-अडीच वर्षांपासून साफसफाई करण्यात आली नव्हती. आता गेल्या आठ-दहा दिवसांपासून काम सुरु आहे. त्याच्या शेजारीच गेटबॉलचेही काम सुरू आहे. त्यामुळे आज पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
मागील काही दिवसांपासून शहरात पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही. मनपाच्या सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर वचक राहिला नाही. या पाणीपूठ्यातील त्रुटी अद्याप लक्षात आल्या नाहीत. दुरुस्तीचे काम सुरू आहे, मात्र उद्या पाणीपुरवठा सुरळीत होईल का नाही हे सांगता येणार नाही. परंतु, ही वस्तुस्थिती प्रशासन लोकांना सांगत नाही, असा आरोप भाजपचे नगरसेवक शैलेश स्वामी यांनी केला आहे.