4,500 रुपयांत पितळाचे दोन हंडे घेतले, त्यावर एकनाथ शिंदेंचे नाव टाकले; लाडक्या बहिणीच्या प्रेमाने मुख्यमंत्री भावूक
धुळे जिल्ह्यातील या लाडक्या बहिणीचं प्रेम पाहून मुख्यंमत्री एकनाथ शिंदे भावूक झाले आहेत. या घटनेनंतर विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलय.
मुंबई : राज्यात लाडकी बहीण योजना (Ladki bahin yojana) सुरू केल्यानंतर महिलांचा तुफान प्रतिसाद या योजनेला मिळत आहे. राज्य सरकारच्यावतीने रक्षाबंधन सणाचा मुहूर्त साधत महिलांच्या बँक खात्यात दोन महिन्यांचा एकत्र हफ्ता म्हणून 3000 रुपये जमा करण्यात आले. पहिल्या टप्प्यात जवळपास सव्वा कोटी महिला भगिनींना या योजनेचा लाभ मिळाला. त्यामुळे, महिलांनी समाधान व्यक्त केलं असून अनेकांनी राज्य सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एका लाडक्या बहिणीची भेट घेतली होती. या बहिणीने योजनेतून मिळालेल्या 3000 रुपयांतून चक्क घुंगरु टाळचा व्यवसाय सुरू केल्याचं पाहायला मिळालं. आता, धुळे (Dhule) जिल्ह्यातील एका लाडक्या बहिणीने मिळालेल्या 4500 रुपयांतून चक्क दोन पितळाची हंडी विकत घेतली असून त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव टाकलं आहे.
धुळे जिल्ह्यातील या लाडक्या बहिणीचं प्रेम पाहून मुख्यंमत्री एकनाथ शिंदे भावूक झाले आहेत. या घटनेनंतर विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर देत, लाडक्या बहिणींकडून मिळत असलेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ''1500 रुपयांत काय होते, असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जात असला तरी आमच्या बहिणींना मायेची भेट देण्याचे समाधानच इतके मोठे होते की क्षुल्लक टीका आम्ही नजरेआड केल्या. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर आजवर मनाला मुरड घालत असलेल्या आवडीच्या गोष्टी कुणी घेतल्या, कुणी छोटेखानी व्यवसाय केला. आम्ही देत असलेली ओवाळणी बहिणी प्रेमाने स्वीकारत आहेत, यातच आमचा आनंद आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. तसेच, धुळ्यातील एका भगिनीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून मिळालेल्या 4500 रुपयांतून पितळ्याचे दोन हंडे विकत घेतले आणि त्यावर भावाकडून सप्रेम भेट म्हणून माझे नाव टाकले, ते पाहूनही आनंदाश्रू तरळले असं भावनिक ट्विट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरुन केलंय.
आमची प्रामाणिक भावना या भगिनींपर्यंत पोहोचते आणि त्यांच्या आणि आमच्या नात्यात मायेची गुंफण होतेय, यापेक्षा आणखी काय हवे? लाडक्या बहिणींचा विश्वास, माया ही मुख्यमंत्री आणि भाऊ म्हणून मला मिळालेली आजवरची सर्वांत मोठी आणि मौल्यवान भेट आहे, असेही मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलंय.
१५०० रुपयांत काय होते, असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जात असला तरी आमच्या बहिणींना मायेची भेट देण्याचे समाधानच इतके मोठे होते की क्षुल्लक टीका आम्ही नजरेआड केल्या. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर आजवर मनाला मुरड घालत असलेल्या आवडीच्या गोष्टी कुणी घेतल्या, कुणी… https://t.co/8t8J1G6JXQ
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 2, 2024
पुढील 5 वर्षे चालणार लाडकी बहीण योजना
दरम्यान, लाडकी बहीण योजनेचा प्रचार व प्रसार करत महिला मतदारांना आकर्षित करण्याचं काम महायुती सरकारकडून सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील महिलांशी मेळाव्यांच्या माध्यमातून संवाद साधत लाडकी बहीण योजना पुढील 5 वर्षांपर्यंत सुरूच राहणार असल्याचे म्हटले. तसेच, विरोधकांकडून होत असलेल्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिलंय.
हेही वाचा
''निवडून आल्यास रामगिरीला बेड्या घालणार, राणेंच्या पोट्ट्यालाही माफी मागायला लावणार''