''निवडून आल्यास रामगिरीला बेड्या घालणार, राणेंच्या पोट्ट्यालाही माफी मागायला लावणार''
मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्यावतीने सोलापूर शहर-मध्य विधानसभा मतदारसंघांमध्ये अल्पसंख्यांक मेळावा आयोजित करण्यात आला होता
सोलापूर : आगामी विधानसभा निवडणुकांसाठी सर्वपक्षीय नेते कामाला लागले असून पुढील काही दिवसांत जागावाटप निश्चित होणार आहे. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील जागावाटप झाल्यानंतर इतर लहान पक्षांना किती जागा मिळणार, कुठल्या मतदारसंघात उमेदवारी मिळणार हेही स्पष्ट होईल. त्यातच, सोलापूरातील कम्युनिष्ट नेत आणि माजी आमदार नरसय्या आडम (Narsayya Adam) यांनी महाविकास आघाडीतून यंदा विधानसभेची जागा मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाला मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंना इंडिया आघाडी म्हणून पाठिंबा दिला होता. त्यावेळीच, विधानसभेला ही जागा माकपला देण्याची मागणी केली होती. त्यानुसार, आता विधानसभेसाठी नरसय्या आडम यांची तयारी सुरू असून अल्पसंख्यांक मेळाव्यातून त्यांनी आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आणि रामगिरी महाराजांवर (Ramgiri Maharaj) जोरदार हल्लाबोल केलाय. तसेच, यंदा निवडणुकीत निवडून आल्यावर रामगिरीला बेड्या घातल्या नाही तर मला आडम मास्तर म्हणू नका, अशा शब्दात त्यांनी इशारा दिला आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्यावतीने सोलापूर शहर-मध्य विधानसभा मतदारसंघांमध्ये अल्पसंख्यांक मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना माजी आमदार नरसय्या आडम यांनी नेहमीच्यास्टाईलने आक्रमक भाषण केलं. तसेच, हिंदू आणि मुस्लीम यांच्यात द्वेष व तेढ निर्माण करत असल्याचा आरोप भाजपवर केला आहे. मेळाव्यात बोलताना नरसय्या आडम यांनी नितेश राणे आणि रामगिरी महाराजांवर सडकून टीका केली. यंदाच्या वर्षी मी निवडून आल्यावर रामगिरीला बेड्या घातल्या नाही तर मला आडम मास्तर म्हणू नका. नारायण राणेच्या पोट्याला देखील आमदार झाल्यानंतर बघायचं आहे. आमदार झाल्यावर त्याला (नितेश राणेला) माफी मागायला लावणार, अशा शब्दात नरसय्या आडम यांनी आक्रमक शैलीत भूमिका मांडली.
वक्फ बोर्डच्या जागेवर नरेंद्र मोदीची नजर आहे. मात्र, मी निवडून आल्यावर रस्त्यावर उतरून लढाई करू. मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण द्यावे, मुस्लिम समाजातील मुलांना त्याचा फायदा होईल, असेही त्यांनी म्हटले. तर, देशात 8 हजार मुस्लिम मुलं जेलमध्ये सडले आहेत, अशी माहिती दिली.
नितेश राणेंकडूनही आक्रमक भाषणे
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून आमदार नितेश राणे यांनी आक्रमक भूमिका मांडताना थेट अल्पसंख्यांक समाजावर टीका केली आहे. तसेच, रामगिरी महाराजांनी केलेल्या वक्तव्याचे समर्थन करत हिंदू जागरण मेळाव्याच्या माध्यमांतून नितेश राणे वादग्रस्त विधाने करत आहेत. त्यामुळे, महायुतीमध्येही नितेश राणेंच्या वक्तव्यावर एकमत नसून राष्ट्रवादी काँग्रसच्या अजित पवार यांनी स्पष्टपणे त्यांचा विरोध दर्शवल्याचं दिसून आलं.