Krishna River : पूरनियंत्रणासाठी कृष्णा नदीवरील नागमोडी वळणे हटवणार, जलतज्ज्ञ आणि निवृत्त अभियंत्यांचा मात्र विरोध
Krishna River : कृष्णा नदीवरील नागमोडी वळणे हटवून नदीचे सरळीकरण करण्याचा विचार सुरू आहे. परंतु, या निर्णयाला जलतज्ज्ञ आणि निवृत्त अभियंत्यांनी विरोध दर्शवला आहे.
Krishna River : कृष्णा नदीला येणाऱ्या पुरामुळे दर वर्षी सांगली ( sangli ) शरहरासह परिसरात पाणी शिरते. त्यामुळे यावर कायमची उपाययोजना करण्यासाठी कृष्णा नदीवरील नागमोडी वळणे हटवून नदीचे सरळीकरण करण्याचा विचार सुरू आहे. परंतु, पूरनियंत्रणासाठी नदीवरील नागमोडी वळणे हटवण्याच्या निर्णयाला जलतज्ज्ञ आणि निवृत्त अभियंत्यांनी विरोध दर्शवला आहे. 1730 साली तत्कालीन कुरुंदवाड सरकारने नदीवरील नागमोडी वळणं हटवण्याचा अयशस्वी प्रयोग केल्याचा दाखला निवृत्त अभियंते विजयकुमार दिवाण यांनी दिला आहे.
कृष्णा खोऱ्यात सातत्याने येणाऱ्या पूर परिस्थितीबाबत सतत उपाययोजना आखण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र पूर रोखण्यात अद्याप तरी अजून म्हणावे असे यश आले नाही. तरीही पूर परिस्थितीशी सामना करण्यासाठी राज्याचा जलसंपदा विभाग विविध उपायांवर काम करत असून यात आता पुन्हा एकदा कृष्णा नदीवरील काही ठिकाणची नागमोडी वळणं कायमची हटवून नदीचे सरळीकरण करण्यावर विचार सुरू आहे. महाविकास आघाडी सरकारकडून कृष्णा नदीतून बोगदा किंवा नदीवर भिंत बांधण्याचा विचार करण्यात आला होता. त्यावेळी देखील या निर्णयावर टीका झाली होती. आता तशीच टीका कृष्णा नदीवरील नागमोडी वळणे कायमची हटवण्याच्या निर्णयावर काही जलतज्ज्ञ आणि निवृत्त अभियंत्यांनी केलीय.
नदीवरील नागमोडी वळणे हटवण्याचा प्रयत्न याआधी 1730 साली तत्कालीन कुरुंदवाड सरकारने केला होता. याचा दाखला निवृत्त अभियंते विजयकुमार दिवाण यांनी दिलाय. पंचगंगा नदी ही शिरोळ नांदणी मार्गे येऊन नरसोबावाडीला मिळते. यावर 1730 साली तत्कालीन कुरुंदवाड सरकारने शिरोळ हद्दीत आनेवाडी जवळ पंचगंगा नदी प्रथम आल्यानंतर नदी वळवून तिथून पूर्णपणे कुरुंदवाड शहराच्या आसपास आणून तो भाग सुजलाम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला होता. परंतु तो प्रयत्न त्यांना अर्धवट सोडून द्यायला लागला होता. कारण पंचगंगा नदी मूळपात्र न सोडता आहे तशी म्हणजे नांदणी शिरोळ मार्गे नरसोबावाडी येथे येऊन मिळालेली आहे. त्यामुळे नदी वळवण्याचा किंवा नदी सरळ करण्याचा जो प्रश्न आहे तो अत्यंत चुकीचा आणि घातक आहे. हा प्रयोग कधीही यशस्वी किंवा कधीही पूर्णपणे शेवटपर्यंत जाण्याची शक्यता नाही. त्यामुळे या प्रयोगातून पर्यावरणाची देखील हानी होण्याची शक्यता आहे, अशी भीती निवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण यांनी व्यक्त केलीय.
महत्वाच्या बातम्या