Sanjay Raut : वंचितचे 50-60 उमेदवार निवडून आले तर त्यांच्यासोबत युतीचा विचार करु; संजय राऊतांचा प्रकाश आंबेडकरांना टोला
Sanjay Raut on Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरची भूमिका जाहीर केली. यावरून संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकर यांना टोला लगावलाय.
मुंबई : 'आम्ही सरकार स्थापन करू शकणाऱ्यांच्या सोबत राहणे पसंत करणार आहे', असे भूमिका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी जाहीर केली. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकर यांना टोला लगावला आहे. वंचितचे 50-60 उमेदवार निवडून आले तर त्यांच्यासोबत युतीचा विचार करु, असे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Election 2024) रणधुमाळी गेल्या महिन्याभरापासून सुरु होती. राज्यात एकीकडे महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सामना रंगला. तर दुसरीकडे प्रहारचे बच्चू कडू (Bacchu Kadu) आणि शेतकरी नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांची तिसरी आघाडी देखील निवडणुकीच्या आखाड्यात आहे. तिसरीकडे राज ठाकरेंची (Raj Thackeray)महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि प्रकाश आंबेडकरांची (Prakash Ambedkar) वंचित बहुजन आघाडीदेखील निवडणुकीला सामोरे गेली. उद्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी पार पडणार आहे. याआधीच प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका जाहीर केली.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून मोठं वक्तव्य केलं आहे. "जर उद्या वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाला किंवा युतीला पाठिंबा देण्यासाठी संख्याबळ मिळाले, तर आम्ही सरकार स्थापन करू शकणाऱ्यांच्या सोबत राहणे पसंत करणार आहे", असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलेल्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळा चर्चांना उधाण आले आहे.
संजय राऊतांचा टोला
संजय राऊत म्हणाले की, प्रकाश आंबेडकर हे लोकशाही मानणारे नेते आहेत. त्यांचे 50-60 आमदार निवडून येत असतील तर आम्ही त्यांचा नक्की विचार करू, असा टोला त्यांनी प्रकाश आंबेडकर यांना लगावला. लोकसभा निवडणुकीत आम्ही त्यांच्यासोबत राहण्याचा प्रयत्न केला होता. विधानसभा निवडणुकीत देखील केला होता. त्यांचं असं म्हणणं आहे की, ज्यांची सत्ता येणार, त्यांच्यासोबत राहणार आहे. आमची सत्ता येत आहेत तर ते आमच्या सोबत राहणार असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले. आता प्रकाश आंबेडकर संजय राऊत यांच्या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या