2024 मध्ये कोकणात भाजपचे 10 ते 11 आमदार आणि दोन खासदार निवडून येतील : प्रसाद लाड
कोकणातील पाच विभागातील शिवसेनेतील नाराज नेते संपर्कात असल्याचा दावा भाजप नेते प्रसाद लाड यांनी केला. सोबतच काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील नेते देखील संपर्कात असल्याचं लाड म्हणाले.

रत्नागिरी : "कोकणातील पाच विभागातील शिवसेनेतील नाराज नेते आमच्या संपर्कात आहेत. 2024 मध्ये भाजपचे 10 ते 11 आमदार निवडून येतील. तर दोन खासदार भाजपचे असतील," असा दावा भाजपचे नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे. ते रत्नागिरीमध्ये बोलत होते. "शिवसेनेतील नाराजी, हिंदुत्वाचा मुद्दा सोडणे, कामं न होणं याबाबत शिवसेनेतील नेते नाराज आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील नेते देखील आमच्या संपर्कात असल्याचं प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका 2024 साठी भाजपने तयारी सुरु केली आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात थेट शिवसेनेला आव्हान देण्याची भाजपने रणनिती आखली आहे. त्यासाठी त्यांनी आता शिवसेनेतील अंतर्गत बंडाळी आणि नाराजीचा फायदा घेण्याची तयारी भाजपने केली आहे. नाराज असलेल्यांना गळाला लावण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निकालानंतर याबाबतच्या घडामोडी या वेगानं घडणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे नाराज असलेल्या माजी मंत्री आणि विद्यमान आमदारांची भाजपसोबत चर्चा झाल्याचंही कळतं. त्यातच आता प्रसाद लाड यांनी अनेक नाराज नेते संपर्कात असल्याचा दावा केला आहे.
नाणार प्रकल्प झाला पाहिजे ही भाजपची भूमिका
नाणार प्रकल्प झाला पाहिजे ही भाजपची भूमिका आहे. त्यासाठी भाजप प्रयत्न करणार असल्याचं महत्त्वपूर्ण वक्तव्य भाजपचे नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी केलं आहे. तसंच नाणार इथे जमीन कोणी किती रुपयांना खरेदी केली याच्या चौकशीची मागणी देखील लाड यांनी केली. ते रत्नागिरीमध्ये बोलत होते. दरम्यान, आधी विरोध करायचा नंतर साटंलोटं करायचं ही शिवसेनेची भूमिका यापूर्वी देखील राहिल्याची टीका प्रसाद लाड यांनी केली आहे. यावेळी त्यांनी समृद्धी महामार्गाचं देखील उदाहरण दिलं.
पवार-मोदी भेट गांभीर्याने घेण्याची गरज नाही
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. परंतु या भेटीला गांभीर्याने घेण्याची गरज नाही. भाजप राष्ट्रवादी काँग्रेससोबत कदापि जाणार नाही. शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. मोदी पवारांना भेटू शकतात. सध्या राज्यात होत असलेली कारवाई, संजय राऊत यांच्यावरील कारवाई किंवा राज्यातील इतर प्रश्नांवर ही भेट झालेली असू शकते, अशी प्रतिक्रिया प्रसाद लाड यांनी पवार-मोदीवर दिली.
संजय राऊत यांची मनोवृद्धी बिघडली : लाड
शिवसेना खासदार संजय राऊत यांची मनोवृती बिघडली आहे. त्यांना गेट वेल सून सांगावं लागेल. किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना प्रसाद लाड म्हणाले की, "किरीट सोमय्यांनी राऊतांना काय ते उत्तर दिलं आहे. सोमय्यांना अडकवण्याचं काम राऊत आणि गँग करत आहे. आम्ही त्याला भीक घालत नाही. आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे."
'मुंबईच्या पोलीस आयुक्तांना कारवाईची यादी'
केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई कधीही संपत नाही. त्यांची कारवाई 25 ते 30 वर्षे चालते. ती न्यायालयातून चालते. मुंबईच्या पोलीस आयुक्तांना कारवाईची एक यादी दिली आहे. आम्हाला डोळ्यात डोळे घालण्याचं आव्हान दिलं आहे. आम्ही त्याला घाबरत नाही. अरेला कारे करणारे आम्ही आहोत, असं थेट आव्हान देखील प्रसाद लाड यांनी दिलं आहे.
संबंधित बातम्या
- शिवसेनेचे दोन माजी मंत्री, एक विद्यमान आमदार भाजपच्या संपर्कात; सेनेच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावण्यासाठी भाजपचा मेगाप्लॅन
- Konkan Refinery : मुख्यमंत्र्यांच्या पत्रानंतर शिवसेनेत मोठी नाराजी, रिफायनरीसाठी चर्चेत असलेल्या गावांमध्ये संपर्क अभियान राबवणार नाही!
Before You Go
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महत्त्वाच्या बातम्या





















