![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
शिवसेनेचे दोन माजी मंत्री, एक विद्यमान आमदार भाजपच्या संपर्कात; सेनेच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावण्यासाठी भाजपचा मेगाप्लॅन
2024 साठी भाजपचं मिशन कोकणशिवसेनेचे दोन माजी मंत्री आणि एक विद्यमान आमदार संपर्कात शिवसेनेतील अंतर्गत बंडाळी, नाराजीचा फायदा उठवण्यासाठी भाजपचा मेगा प्लॅन!
![शिवसेनेचे दोन माजी मंत्री, एक विद्यमान आमदार भाजपच्या संपर्कात; सेनेच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावण्यासाठी भाजपचा मेगाप्लॅन Shiv Sena's two former ministers, one sitting MLA in touch with BJP; BJP's megaplan in Shiv Sena's stronghold Konkan शिवसेनेचे दोन माजी मंत्री, एक विद्यमान आमदार भाजपच्या संपर्कात; सेनेच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावण्यासाठी भाजपचा मेगाप्लॅन](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/7/2017/11/15140031/3-shiv-sena-allegation-on-bjp-on-a-bribe-of-5-crore-bjp-shiv-sena-dispute-news.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
रत्नागिरी : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका 2024 साठी भाजपने आता तयारी सुरु केली आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात थेट शिवसेनेला आव्हान देण्याची भाजपने रणनिती आखली आहे. त्यासाठी त्यांनी आता शिवसेनेतील अंतर्गत बंडाळी आणि नाराजीचा फायदा घेण्याची तयारी भाजपने केली आहे. याचाच एक भाग म्हणून शिवसेनेतील दोन नाराज मंत्री आणि एक विद्यमान आमदाराची भाजपसोबत चर्चेच्या दोन फेरी झाल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. तसेच कोकणच्या राजकीय वर्तुळात देखील याची चर्चा सुरु आहे. नाराज असलेल्यांना गळाला लावत थेट शिवसेनेला आव्हान देण्याची भाजपने तयारी केली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या निकालानंतर याबाबतच्या घडामोडी या वेगाने घडणार आहेत. कोकणातील संपूर्ण परिस्थिती आणि शिवसेनेचा पारंपरिक मतदार असलेल्या कोकणात भाजप जोरदार तयारी करत आहे. सध्या निरीक्षक म्हणून मूळ कोकणातील आणि आक्रमक, अभ्यासू नेता असलेल्या आशिष शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच प्रसाद लाड देखील मागील काही दिवसांपासून कोकणात दौरे करत आहेत. तर माजी खासदार आणि भाजपचे नेते निलेश राणे सध्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मेळावे, विविध कार्यक्रम, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यामुळे भाजपने लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुकांची तयारी केल्याची चर्चा कोकणातील राजकीय वर्तुळात जोरदार सुरु आहे.
कोकणात भाजप किमया करेल?
कोकणी माणूस शिवसेनेचा पारंपरिक मतदार राहिला आहे. मुंबई मनपामध्ये देखील कोकणी माणूस महत्वाची भूमिका बजावतो. ही गोष्ट भाजप चांगला जाणतो. सध्या रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केल्यास भाजपची राजकीय ताकद दिसून येत नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणे यांच्या रुपाने भाजपला शिवसेनेवर अंगावर घेणारा आणि राजकीय ताकद असलेला नेता मिळाला आहे. सध्या नितेश राणे कणकवली येथून आमदार आहेत. त्यापलिकडे भाजपची राजकीय ताकद नाही. उलटपक्षी कोकणात शिवसेना मजबूत आहे. पण, सध्या शिवसेनेमध्ये अंतर्गत कुरघोडी देखील आहेत. त्याचाच फायदा घेत भाजपनं कोकणात मिशन 2024 सुरु केलं आहे. अर्थात निकालाअंती आणि तत्कालीन राजकीय स्थितीवर भाजपला किती यश मिळणार हे कळू शकणार आहे.
शेलारांचा फायदा होईल?
आशिष शेलारांसारखा आक्रमक आणि अभ्यासू नेता पक्षात आल्यानं भाजपला राजकीय फायदा तितका होणार नाही असं राजकीय अभ्यासक सांगतात. अर्थात भाजपची तळागाळातील कार्यकर्त्यांची ताकद देखील नाही. शिवाय, सिंधुदुर्गमध्ये आल्यास नारायण राणे यांच्या कलेने घेणे शेलारांना जमणार आहे का? असा सवाल देखील कोकणातील राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)