(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बेळगाव महापालिकेसमोर भगवा फडकवण्यासाठी निघालेल्या शिवसैनिकांना कर्नाटक पोलिसांनी सीमेवर रोखलं
मराठी बांधवांच्या भावना दुखावणारा लाल-पिवळा ध्वज त्वरित हटावावा, अशी मागणी करत बेळगावकडे निघालेल्या शिवसैनिकांना कर्नाटक पोलिसांनी रोखलं. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमारही केला.
बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी बांधवांच्या भावना दुखावणारा लाल-पिवळा ध्वज त्वरित हटावावा, अशी मागणी करत बेळगावकडे निघालेल्या शिवसैनिकांना कर्नाटक पोलिसांनी रोखलं. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमारही केला. सोबतच कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्राच्या सीमेतच रोखल्याचा दावा आंदोलनकांना केला. पोलिसांनी रोखल्याने शिवसैनिकांनी सीमेवरच ठाण मांडला. जोपर्यंत भगवा फडकावणार नाही, तोपर्यंत मागे फिरणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली.
बेळगाव महापालिकेसमोर कन्नक रक्षक संघटनेने लाल पिवळा ध्वज अनधिकृतरीत्या लावला आहे. हा ध्वज त्वरित हटवावा या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा आयोजित केला होता. मात्र या मोर्चाला बेळगाव जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारला. तरीही ठरल्याप्रमाणे शिवसैनिक बेळगावमध्ये दाखल होण्यासाठी निघाले. कोणत्याही परिस्थितीत भगवा फडकवणारच असा निर्धार शिवसैनिकांनी व्यक्त केला.
दरम्यान आंदोलकांना बेळगावात प्रवेश न देता पोलिसांनी शिनोळी जवळ महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरच रोखलं. शिवाय सीमेसह महापालिका परिसरात मोठा बंदोबस्त ठेवला आहे. पोलिसांनी महानगरपालिका कार्यालयाकडे जाणारे रस्ते बॅरिकेड्स लावून बंद केले आहेत. महापालिकेकडे जाणाऱ्या व्यक्तीची पूर्ण चौकशी करून सोडले जात आहे. वाहनांना तर पूर्णपणे प्रवेश बंदी केली आहे.
दरम्यान, बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समिती आणि बेळगावचे जिल्हाधिकारी यांच्यात बैठक सुरु आहे. महापालिकेसमोर कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी अनधिकृतपणे लावलेला वादग्रस्त ध्वज काढण्यासाठी बैठकीत चर्चा सुरु आहे.
तर दुसरीकडे कोल्हापुरातील शिवसैनिकांनी बेळगाव जिल्ह्यात भगवा ध्वज फडकवला आहे. बेळगाव पोलिसांना चकवा देत कोनेवाडी गावात शिवसैनिकांनी भगवा फडकवला.
संबंधित बातम्या
कर्नाटक व्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणण्यासाठी कटिबद्ध, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुनरुच्चार
Maharashtra Karnataka border | महाराष्ट्र-कर्नाटक बॉर्डरवर शिवसैनिक आणि कर्नाटक पोलीस आमनेसामने