कर्नाटकची एक इंचही जमीन महाराष्ट्राला देणार नाही, सीमा वादावर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं उद्धव ठाकरेंना उत्तर
कर्नाटक व्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचं वक्तव्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी उत्तर दिलं आहे. कर्नाटकची एक इंचही जमीन महाराष्ट्राला देणार नाही, असं येडियुरप्पा म्हणाले.
बेळगाव : कर्नाटक व्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचं वक्तव्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. त्यावर आता कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी उत्तर दिलं आहे. "कर्नाटकची एक इंचही जमीन महाराष्ट्राला देणार नाही," असं येडियुरप्पा म्हणाले. संवेदनशील महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर बेळगावसह अनेक ठिकाणी सोमवारी (18 जानेवारी) निषेध व्यक्त करण्यात आला होता.
मुख्यमंत्र्यांनी 16 जानेवारी रोजी कर्नाटक-महाराष्ट्र सीमा लढ्यातील हुतात्म्यांना हुतात्मा दिनानिमित्त विनम्र अभिवादन केलं. यावेळी कर्नाटक व्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी अभिवादनात केला. मुख्यमंत्र्यांनी अभिवादन संदेशात म्हटलं होतं की, "सीमा प्रश्नात सर्वस्वाची होळी करणारे हुतात्मे आणि त्यांच्या त्याग, समर्पणात होरपळूनही आजही या लढ्यात धीराने आणि नेटाने सहभागी कुटुंबियांना मानाचा मुजरा. कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक आणि सांस्कृतिक प्रदेश महाराष्ट्रात आणणे हीच या सीमा लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांना आदरांजली ठरणार आहे. त्यासाठी आम्ही एकजूट आणि कटिबद्ध आहोत."
महाराष्ट्राला कर्नाटकची एक इंच जमीनही देणार नाही : येडियुरप्पा उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर कर्नाटकात विरोध पाहायला मिळाला. यावर प्रतिक्रिया देताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा म्हणाले की, "कर्नाटकची एक इंचही जमीन महाराष्ट्राला दिली जाणार नाही. उद्धव ठाकरे केवळ राजकारणासाठी अशी वक्तव्ये करत आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे मला दु:ख झालं. यामुळे सध्याचं सौहार्दाचं वातावरण बिघडू शकतं. मला आशा आहे की, एका खऱ्या भारतीयाप्रमाणे उद्धव ठाकरे संघराज्याच्या सिद्धांतांच्या प्रति कटिबद्धता आणि सन्मान दाखवतील. कर्नाटकात मराठी भाषिक सौहार्दाने कन्नडिगांसह राहत आहेत."
सुटलेला मुद्दा पुन्हा भडकावण्याचा प्रयत्न करु नये : सिद्धरामय्या तर दुसरीकडे काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धारामय्या म्हणाले की, "बेळगाव कर्नाटकचा अविभाज्य भाग आहे. जो मुद्दा अनेक वर्षांपूर्वीच सुटला आहे, तो पुन्हा भडकावण्याचा प्रयत्न करु नये. उद्धव ठाकरे केवळ शिवसैनिक, पक्षप्रमुखच नाही तर एक जबाबदार मुख्यमंत्री देखील आहेत."
एचडी कुमारस्वामींची उद्धव ठाकरेंवर टीका जेडीएसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. "उद्धव ठाकरे अतिरेक्यासारखी भाषा बोलत आहेत. कर्नाटकचा भाग महाराष्ट्रात सामील करणारं त्यांचं वक्तव्य हे चीनच्या विस्तारवादासारखंच आहे," असं ते म्हणाले.