(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jitendra Awhad Daughter Reception : साधेपणाचा दिखावा होता? जितेंद्र आव्हाडांच्या मुलीचं गोव्यात ग्रँड रिसेप्शन, चर्चांना उधाण
Jitendra Awhad Daughter Grand Reception : साधेपणाचा दिखावा होता? जितेंद्र आव्हाडांच्या मुलीचं गोव्या ग्रँड रिसेप्शन, चर्चांना उधाण
Jitendra Awhad Daughter Grand Reception : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीचं लग्न मुंबईत 7 डिसेंबरला अगदी साधेपणाने साजरं झालं. कोरोनाच्या संकटात राज्यात एक चांगला आदर्श घालून दिला म्हणून आव्हाड कुटुंबियांचं सर्वत्र कौतुकही झालं. मात्र आता जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीच्या रिसेप्शन सोहळ्यापूर्वीच्या संगीत सोहळ्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे व्हिडीओ पाहिल्यानंतर, खरंच आव्हाड यांनी मुलीचं लग्न साधेपणाने लावलं की, केवळ दिखावा केला अशा प्रकारची चर्चा जोरदार रंगू लागली आहे. काल गोव्यातील प्रसिद्ध ग्रँड हयात हॉटेलमध्ये जितेंद्र आव्हाड यांची मुलगी नताशाच्या लग्नाचा संगीत सोहळा पार पडला आहे. या सोहळ्यासाठी संपूर्ण हॉटेल बुक करण्यात आलं आहे. या कार्यक्रमासाठी राज्यातील अनेक मंत्री, बडे कलाकार आणि परदेशातील पाहुणे उपस्थित होते. तर आज होणाऱ्या रिसेप्शनसाठी बडी मंडळी उपस्थित राहणार असल्याचं कळत आहे.
गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळामध्ये लग्नाचे वारे वाहू लागले आहेत. अनेक नेते मंडळींच्या मुला-मुलींचे विवाहसोहळे थाटामाटत पार पडले. पण अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या एकुलत्या एका मुलीचा विवाहसोहळा अगदी साध्या पद्धतीने झाल्याच्या चर्चा काही दिवसांपूर्वी होत होत्या. जितेंद्र आव्हाड यांची एकुलती एक मुलगी नताशा आणि एलन पटेल यांचा विवाह अत्यंत साध्या रजिस्टर पद्धतीने संपन्न झाला होता. सोशल मीडियावर जितेंद्र आव्हाडांवर कौतुकाचा वर्षाव होत होता. एकिकडे लाखो रुपये खर्च करुन आपल्या मुला-मुलींचे विवाहसोहळे आणि दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांनी एकुलत्या एका मुलीचा विवाहसोहळा साध्या पद्धतीनं केल्यानं अनेक बड्या नेत्यांशी तुलना करण्यात आली होती. पण अशातच गोव्यातील ग्रँड रिसेप्शनचा व्हिडीओ समोर आल्यानं अनेक चर्चांना उधाण आलं आहे.
पाहा व्हिडीओ : आधी साधेपणानं लग्न, मग गँड रिसेप्शन
जितेंद्र आव्हाड झाले होते भावूक
लेकीच्या लग्नानंतर जितेंद्र आव्हाड भावूक झाल्याचंही पाहायला मिळालं होतं. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवादही साधला होता. ते म्हणाले होते की, "25 वर्ष आपल्या अंगा-खांद्यावर खेळलेली मुलगी आता आपल्या घरात नसणार, ही भावनाच खूप वेदनादायी आहे. या कठीण वेळी एखाद बाप काय बोलणार? किताही मन कठोर करण्याचा प्रयत्न केला तरी मन तयार होत नाही. आपल्यावर प्रेम करणारी, वेळेप्रसंगी ओरडणारी मुलगी उद्या घरात नसणार म्हणजे, घराचं घरपणच जाणार. लग्न साध्या पद्धतीनं व्हावे ही मुलीचीच इच्छा होती, म्हणूनच या पद्धतीने लग्न करण्यात आलं आहे.", असं त्यांनी माध्यमांशी सांगितलं होतं.
दरम्यान, सध्या सोशल मीडियावर जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीच्या रिसेप्शन सोहळ्यापूर्वीच्या संगीत सोहळ्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. हे व्हिडीओ पाहिल्यानंतर, खरंच आव्हाड यांनी मुलीचं लग्न साधेपणाने लावलं की, केवळ दिखावा केला, अशा चर्चा सुरु आहेत.
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा