जालन्यातील 'मौत का कुआं'; दोन दिवसात दोन गाड्यांना विहिरीत जलसमाधी, चौघांचा मृत्यू
औरंगाबादहून शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या एका कुटुंबाच्या कारला अपघात झाला. कार विहिरीचा कठडा तोडून थेट विहिरीत कोसळली. या कारमध्ये एकाच कुटुंबातील 5 जण होते. यापैकी आरती फरदडे आणि 4 वर्षाची माही फरदडे या माय-लेकींचा मृत्यू झालाय.
जालना : जालना जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून एक विहीर चर्चेचा विषय बनलीय. आज सकाळी 6 च्या सुमारास भरधाव कार विहिरीचा कठडा तोडून थेट पाण्यात कोसळली. यामध्ये असलेल्या 5 पैकी 3 जनांना वाचवण्यात यश आलं, मात्र माय-लेकीचा बुडून मृत्यू झाला. विशेष म्हणजे 36 तासापूर्वी असाच अपघात होऊन दोघांना जीव गमवावा लागला होता. साक्षात यम या विहिरीत दडून बसल्याचा प्रत्यय पंचक्रोशीतल्या लोकांना येऊ लागलाय. जालना शहरापासून जवळच असलेल्या या जामवाडीच्या विहिरीत डोकावून पाहणाऱ्यांची गर्दी आता वाढू लागली आहे.
आज सकाळी औरंगाबादहून शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या एका कुटुंबाच्या कारला अपघात झाला. जालना देऊळगाव राजा रोडवरील या जामवाडी रस्त्यावरून चालकाचे नियंत्रण सुटले आणि ही कार विहिरीचा कठडा तोडून थेट विहिरीत कोसळली. या कारमध्ये एकाच कुटुंबातील 5 जण होते. यापैकी आरती फरदडे आणि 4 वर्षाची माही फरदडे या माय-लेकींचा मृत्यू झालाय.
आजचा अपघात होण्यापूर्वी 12 तारखेच्या संध्याकाळी 7 वाजता बीडवरून येणाऱ्या दोघांवर या विहिरीच्या रूपाने काळाने झडप घातली. वेगात असलेल्या ब्रेझा गाडीचे चालक असलेल्या अझर कुरेशी या युवकांचे गाडीवरून नियंत्रण सुटले आणि गाडी थेट विहिरीत कोसळली. गाडीला ऑटोमॅटिक लॉक असल्याने आणि विहीर तुडुंब भरलेली असल्याने चालक अझर कुरेशी आणि त्याच्या साथीदार अब्दूल मन्नान याचा बुडून मृत्यू झाला.
दोन्ही घटनामुळे नक्की येथील अपघातांना काय कारणं आहेत, या शोध घेतला जातोय. जालना-देऊळगाव राज रोडवरच्या या रत्याच्या कामात संबंधित कंत्राटदाराने निकृष्ट आणि चुकीचे काम केल्याने हे अपघात झाल्याचा गावकऱ्यांनी आरोप केला आहे. तर ग्रामस्थांनी संबंधित कंपनी आणि ठेकेदारावर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी केलीय.
दरम्यान गंगाबाई इंडस्ट्रीज आणि कन्ट्रक्शन्स कंपनीवर ग्रामस्थांनी आरोप केलेत. मात्र कंपनीने हात वर करत ग्रामस्थांच्या रस्ता आडवा आडवीच्या कामामुळे रस्त्याचे काम रखडल्याचा दावा केलाय. गावकरी आणि कंपनीच्या या वादात या रस्त्याचे काहीच भांडण नसलेल्या लोकांना मात्र नाहक जीव गमवावा लागतोय.
माझाच्या पडताळणीत काय आढळलं?
विहीर रस्त्याच्या कडे लगत आहे. रस्त्याचे काम अर्धवट असणे, एक पदरी रस्ता, रस्त्यालगत अपूर्ण भराव, दिशा दर्शक फलक नसणे आणि काम अर्धवट झाल्याने उडत असलेली धूळ इत्यादी कारणे येथील अपघाताला असू शकतात. वाहन चालकांचा निष्काळजीपणा देखील असण्याची शक्यता आहे.