(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मनोज जरांगेंच्या तब्येतीबाबत महत्वाची अपडेट, बीपी लो, सलाईनही लावले,आंतरवली सराटीत उपचार सुरु, डॉक्टर म्हणाले...
आरक्षणप्रश्न तापला असतानाच आज आंतरवली सराटी येथे मनोज जरांगे यांची तब्येत बिघडली होती. त्यांचा बीपी लो झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
Jalna: राज्यात मराठा आरक्षणप्रश्न चांगलाच गाजत असून आंतरवली सराटी मध्ये आमरण उपोषण स्थगित केल्यानंतर आज पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडल्याचे दिसून आले. छत्रपती संभाजीनगरमधून अंतरवली सराटीमध्ये राहणार असल्याचे त्यांनी सांगितल्यानंतर आज चार वाजेच्या दरम्यान अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.
दरम्यान जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीत मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे यांच्यावर डॉक्टरांनी उपचार सुरू केले असून अशक्तपणा जाणवून बीपी देखील लो झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. 20 जुलैपासून सुरू झालेले आमरण उपोषण अवघ्या चार दिवसात स्थगित केल्यानंतर सरकारला मराठा आरक्षणासाठी त्यांनी वेळ वाढवून दिली आहे.
अस्वस्थ वाटू लागल्याने जरांगेंना सलाईन
मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे यांची आज अचानक तब्येत बिघडल्याने त्यांच्यावर अंतरवली सराटीत डॉक्टरांनी उपचार केले. दरम्यान अस्वस्थ वाटू लागल्याने उपचार सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले. बीपी लो झाल्याने जरांगेंना सलाईन लावल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
जरांगेंनी दरेंकरांवर साधला निशाणा
दरम्यान मनोज जरांगेंनी आज विधानसभा निवडणुकीत भाजपचे जे आमदार उभे राहणार नाहीत, त्यांना आमच्याविरोधात बोलायला लावले जात आहे. प्रवीण दरेकरांच्या माध्यमातून फडणवीसांनी मराठा समाजात फूट पाडण्याचे काम केले. अशी टीका केली. प्रवीण दरेकर यांनी मराठा क्रांती मोर्चाचे तीन तुकडे केले. आरक्षणाच्या बैठकांना मराठा समाजाला बोलवायचे आणि त्यांना बदनाम करायचे काम प्रवीण दरकेर यांनी केले. विधानपरिषदेला आमदारकी मिळते, यासाठीच ते मराठा समाजात फूट पाडण्याचे काम करतात. त्यांना फूस लावणारा कोकणातील एक नेता आहे. आता मराठा समाजाचे आंदोलन सुरु नाही. पण शांततेच्या काळात यांना आंदोलन घडवून आणायचे आहे. 7 ऑगस्टच्या सभेत ते काहीतरी घडवून आणू शकतात, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
मराठवाड्यात आज आरक्षणाचा विषय गाजला
दरम्यान राज्यात आज मराठा- ओबीसी आरक्षणाचा विषय चांगलाच गाजल्याचे दिसून आले. विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात भाजपच्या मंत्र्यांसह वंचित बहुजनचे प्रकाश आंबेडकरही मराठवाड्यात होते. यावेळी ओबीसी आरक्षणासाठी त्यांनी रॅली काढली. मराठ्यांचा प्रश्न वेशीवर टांगण्यासाठी जरांगेंनी 288 जागा लढवाव्यात असं आंबेडकरांनी जरांगेंना म्हटलंय. यावेळी ते म्हणाले, जरांगे पाटील यांनी 288 जागा मराठ्यांचा प्रश्न वेशीवर टांगण्यासाठी लढवणं आवश्यक आहे. सर्वसामान्य मराठा समाजाला न्याय देण्यासाठी त्यांचा आवाज सरकार दरबारी पोहोचण्यासाठी, मनोज जरांगे यांनी 288 जागा या लढवल्या पाहिजेत.
रात्री गावकऱ्यांनी ऐकलं नाही, मला सलाईन लावले
सरकार आमरण उपोषण शक्तीला घाबरत आणि त्यांच्या सत्तेच्या खुर्चीला घाबरतात मला उपोषण करू द्या म्हणून मी गावकऱ्यांना म्हणत होतो. रात्री गावकऱ्यांनी ऐकलं नाही त्यांनी मला सलाईन लावले. सलाईन वर पडू न राहण्यात उपयोग नाही, त्यापेक्षा उपोषण न केलेलं बरं या मतावर मी आलो आहे. तिथे पडून राहण्यापेक्षा मी मतदार संघाची तयारी करेल असेही जरांगे (Manoj Jarange) पुढे म्हणालेत. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी जालन्यातील अंतरवाली सराटीत सुरू केलेले आमरण उपोषण स्थगित केले होते.
हेही वाचा: