(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोठी बातमी : फडणवीसांचं आरक्षण वाढवण्याचं वक्तव्य जावईशोध, SC, ST आरक्षण वाढ कोणाच्या बापाच्या हातात नाही : प्रकाश आंबडेकर
देवेंद्र फडणवीस यांचे आरक्षण वाढवण्यासंदर्भातील वक्तव्य हे म्हणजे त्यांचा जावई शोध आहे असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे.
Prakash Ambedkar: राज्यात विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मराठा-ओबीसी (Maratha OBC reservation) आरक्षणाचा तिढा राजकीय वर्तुळात चर्चेचे केंद्रबिंदू झाल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून राज्यातील नेत्यांची टीका, प्रत्युत्तरे येत असताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर खोचक टीका केल्याचे दिसून आलंय. फडणवीसांचा आरक्षण वाढवण्याचे वक्तव्य हा जावईशोध असून एससी एसटी आरक्षण वाढ कोणाच्या बापाच्या हातात नाही, अशी टीका त्यांनी फडणवीसांवर केली आहे.
दरम्यान भाजप आमदार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्याशी अचानक भेट झाल्याचे सांगत आम्ही ओबीसी आरक्षण बचाव संदर्भातील पत्र हे पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांच्यासह सर्वांना दिली आहेत असेही ते म्हणाले. प्रकाश आंबेडकर हे काल दिवसभर लातूरमध्ये होते. आज ते लातूरवरुन बीडकडे निघाले होते. त्याचवेळी पंकजा मुंडे या बीडवरुन लातूरकडे निघाल्या होत्या. त्यावेळी बीड आणि लातूरच्या मध्ये दोन्ही नेत्यांची भेट झाली. दोघांनी एकमेकांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. ही भेट नियोजित नव्हती, अचानक भेट झाली. मात्र ही राजकीय वर्तुळातील महत्त्वाची भेट आहे.
फडणवीसांचे आरक्षण वाढीचे वक्तव्य हा जावई शोध
देवेंद्र फडणवीस यांचे आरक्षण वाढवण्यासंदर्भातील वक्तव्य हे म्हणजे त्यांचा जावई शोध आहे. एससी एसटी चा आरक्षण वाढवावे हे कोणाच्या बापाच्या हातात नाही. हे स्वतःच्या अंगलट आलेले खेळ आहेत. त्यामुळे तर टोलवाटोलवी करून काही उत्तर देत आहेत. असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
जरांगेंच्या मागणीला तुमचं समर्थन की विरोध?
नरेंद्र मोदी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट करावं, जरांगे पाटील यांनी केलेल्या मागणीला तुमचं समर्थन आहे की विरोध. विरोध असेल तर विरोध म्हणून सांगा. समर्थन असेल तर समर्थन आहे म्हणून सांगा, पण फाटे कशाला फोडता ? असा सवाल आंबेडकर यांनी केलाय.आम्ही पहिल्यापासून मागणी करत आहोत ओबीसींचे आरक्षणाचे ताट वेगळे असावे आणि मराठ्यांच्या आरक्षणाचे ताट वेगळे असावे. यात वेगळं काही नाही. आमच्या भूमिकेत बदल नाही असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
प्रकाश आंबेडकरांना रोहित पवारांची साद
नुकतीच वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा आणि पक्षप्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि भाजपच्या नवनिर्वाचित विधानपरिषद आमदार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची भेट झालीय. लातूरहून बीडकडे येत असताना प्रकाश आंबेडकर यांची पंकजा मुंडे यांनी भेट घेतलीय. सध्या प्रकाश आंबडेकर यांची आरक्षण बचाव यात्रा सुरु आहे. ही यात्रा लातूरवरून आज बीडमध्ये दाखल होत आहे. त्यादरम्यान पंकजा मुंडे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेत त्यांचं स्वागत केलं. पंकजा मुंडे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधाण आले असताना रोहित पवारांनी प्रकाश आंबेडकरांना सोबत येण्याचं आवाहन केलं आहे.