Jalgaon : जळगावच्या राजमल लखीचंद ज्वेलर्समधून 87 लाख रुपये जप्त, दागिनेही सील, आतापर्यंत काय घडलं?
Jalgaon News : जळगावातील आरएल समूहाची इंडीकडून करण्यात आलेल्या तपासणीत 87 लाख रुपये जप्त करण्यात आले.
जळगाव : स्टेट बँक ऑफ इंडियाकडून (State Bank India) घेतलेल्या 525 कोटी रुपयांच्या थकीत कर्जप्रकरणी जळगावातील (Jalgaon) आर. एल. समूहाची ईडीकडून (R L Jwellers) करण्यात आलेल्या तपासणीमध्ये 87 लाख रुपये जप्त करण्यात आले. तसेच दागिने सील करण्यात आले असून, ही फर्म नातेवाईकांच्या नावाने असताना कारवाई करणे चुकीचे असल्याचा दावा माजी खासदार तथा आर. एल. समूहाचे संचालक ईश्वरलाल जैन (Ishwarlal Jain) यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केला आहे.
जळगावच्या (Jalgaon Crime) आरएल ग्रुपवर ईडीने (ED) छापेमारी करत लाखो रुपयांची रोकडसह कोट्यवधी रुपयांचे सोने ताब्यात घेतल्याची कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. आर. एल. समूहाने स्टेट बँक ऑफ इंडियाकडून घेतलेल्या 525 कोटी रुपयांच्या थकीत कर्जाप्रकरणी बँकेने आणि आर. एल. समूहाने परस्परविरोधी दावे केल्याने वाद सुरु आहे. थकीत कर्ज प्रकरण मार्गी लागत नसल्याने स्टेट बँकेने दिल्ली सीबीआयकडे केलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल आहे. गुरुवारी सक्त वसुली संचालनालयाच्या सुमारे 25 अधिकाऱ्यांच्या पथकाकडून तपासणी करण्यात आली. गुरुवारी पहाटेपर्यंत तपासणी केल्यावर ईडी पथकाने आर एल ज्वेलर्सच्या (Rajmal Lakhichand) शोरुममधील 87 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे असून शोरुममधील सोन्याचा स्टॉक सील केला आहे. दरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी ईश्वरलाल जैन त्यांचे पुत्र आणि माजी आमदार मनीष जैन तसेच दोन्ही नातवांचे जबाब नोंदवून घेतले असून अधिक माहिती घेण्यासाठी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स देखील बजावल्याचे समोर आले आहे.
या कारवाई संदर्भात रियल समूहाचे संचालक ईश्वरलाल जैन यांनी पत्रकारांची देखील संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, स्टेट बँक आणि समूहामध्ये थकीत कर्जावरुन हा वाद सुरु आहे. त्यावरुन बँकेने सीबीआयकडे गुन्हा दाखल केला आहे. तपासणी करताना रोख रक्कम जप्त करणे व सोने सील करण्याची केलेली कारवाई गैर असून त्या विरोधात कायदेशीर लढाई लढणार आहोत. पथकाने जेथे कारवाई केली, ती आर एल एंटरप्राईज ही फर्म आपल्या नातवांच्या नावाने आहे, त्यांचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही. त्यासाठी मला भांडावे लागणार असून 15 आणि 16 ऑगस्ट रोजी बँक बंद होती. त्यामुळे रकमेचा भरणा झालेला नाही. तसेच हिशोब सुद्धा लिहिला गेलेला नाही, असे असतानाही 87 लाख रोकड होती, ती जप्त करणे चुकीचे आहे. तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना कागदपत्रे दिलेली असल्याचे प्रतिक्रिया जैन यांनी दिली.
ईडीची कारवाई आमच्यासाठी त्रासदायक
ईश्वर जैन यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, "ईडीने केलेली ही कारवाई कायद्याला धरुन नाही, त्याविरोधात आपण न्यायालयात लढा देणार आहोत. त्यात आपल्याला यश मिळेल असा विश्वास आहे. मात्र झालेल्या कारवाईमुळे सर्वच सोने, रोकड त्यांनी ताब्यात घेतल्याने आपला व्यावसाय आज अडचणीत आला आहे. तो पुन्हा उभा करण्यासाठी आता आपल्या मित्र परिवार आणि नातेवाईक यांची मदत घ्यावी लागणार आहे. लवकरच आपण हा व्यवसाय पुन्हा उभा करु, असा विश्वास असला तरी आज मात्र ईडीची कारवाई आमच्यासाठी त्रासदायक ठरली आहे. या घटनेत आरएल ग्रुपवर झालेली ही कारवाई राजकीय हेतूने झाल्याची चर्चा केली जात असली तरी मला अजून तरी यामध्ये राजकारण आहे किंवा नाही, हे सांगू शकत नाही."
इतर महत्वाची बातमी :