राजकीय सूडापोटी कारवाई झाली असं म्हणणार नाही, पण आपण शरद पवारांच्या पाठिशी कायम; ईडीच्या कारवाईनंतर ईश्वर बाबूजी जैन यांची प्रतिक्रिया
Rajmal Lakhichand Jewelers: माझ्या नातवांच्या फार्मचा कुठलाही संबंध नसताना त्यांच्यावर कारवाई कर त्यांची रोकड तसेच मुद्देमाल सील केल्याचा आरोप राजमल लखीचंद ज्वेलर्सचे मालक ईश्वर बाबूजी जैन यांनी केला.
जळगाव : आपल्या मुलाने स्टेट बँकेच्या विरोधात केसेस केल्याने बँकेने कर्ज प्रकरणात आपल्यासोबत तडजोड करण्यास नकार दिला, तसेच या प्रकरणात ईडीने जी कारवाई केली ती चुकीची आहे अशी प्रतिक्रिया राजमल लखीचंद ज्वेलर्सचे मालक ईश्वर बाबूजी जैन यांनी दिली आहे. आता या प्रकरणात जे काही होईल ते कायदेशील होईल असंही ते म्हणाले. शरद पवारांच्या पाठिशी असल्यामुळे ही कारवाई झाली का याची माहिती नाही, पण आपले आणि शरद पवारांचे अनेक वर्षांपासूनचे संबंध असून त्यांच्याच पाठिशी राहणार असंही ते म्हणाले.
राजमल लखीचंद ज्वेलर्सचे मालक ईश्वर बाबूजी जैन यांनी इडीच्या सुरू असलेल्या कारवाई प्रतिक्रिया दिली आहे. यात त्यांनी नेमकं प्रकरण काय ईडीची कारवाई नेमकी कशासाठी या सर्व बाबींची माहिती दिली. ईडीने केलेली ही कारवाई चुकीच्या पद्धतीने केली असून त्यावर आक्षेप असल्याचंही ते म्हणाले.
मुलाने स्टेट बँकेच्या विरोधात केसेस केल्या आहेत. त्याने त्या केसेस मागे घ्यावा, पण तो त्या केसेस मागे घेत नसल्यामुळे बँक तडजोड करायला तयार नाही. त्यामुळेच या कारवाईला सामोरे जावे लागत आहे. मात्र जे होईल ते कायद्यानुसार होईल असे ईश्वरलाल बाबूजी जैन यांनी म्हटलं.
स्टेट बँक ऑफ इंडियाने या प्रकरणी सीबीआयकडे तक्रार दाखल केली होती, त्या तक्रारीवरून सीबीआयने गुन्हा नोंदवला होता अशी माहिती ईश्वरलाल बाबूजी जैन यांनी दिली. ही फिर्याद रद्द व्हावी यासाठी आम्ही हायकोर्टात याचिका दाखल केली आहे आणि त्याच्यावर कामकाज सुद्धा सुरू आहे अशीही माहिती त्यांनी दिली.
ईश्वरलाल बाबूजी जैन म्हणाले की, अशाच प्रकारच्या एका प्रकरणांमध्ये सुप्रीम कोर्टाचा निकाल समोर आला आहे. यात फॉरेन्सिक ऑडिटची कॉपीही दिली गेली पाहिजे तसेच डिफाल्टर अकाउंट घोषित करण्यापूर्वी संबंधित त्याला संधी दिली पाहिजे, त्या दोन्ही तक्रारदारांसोबत झाल्या नाहीत त्यात संबंधितांची फिर्याद रद्द करण्यात आली. त्याच पद्धतीने आमचीसुद्धा अशीच केस असून आम्हालासुद्धा वारंवार मागणी केल्यानंतरही संबंधित तपासणी करून फॉरेन्सिक ऑडिटची कॉपी देण्यात आलेली नाही. तसेच मला कुठलीही संधी सुद्धा दिलेली नाही आणि संबंधित तपासणी डायरेक्ट घोषित करून टाकली. त्यामुळे हे नियमाला धरून नाही, नियम बाह्य आहे.
सीबीआयच्या फिर्यादीनुसार इडीने तपास करताना जी कारवाई केली आहे ती मला चुकीची असल्याचं ईश्वरलाल बाबूजी जैन म्हणाले. ते म्हणाले की, माझ्या नातवांच्या नावाने आरएल एंटरप्राइजेस नावाची कंपनी आहे. त्याचा आर. एल ग्रुप शी कुठलाही संबंध नाही. ते स्वतंत्र असतानाही त्यांच्याशी संबंधित गोष्टीसुद्धा सिझ केल्या जात आहेत. हे चुकीचे आणि बेकायदेशीर असून त्यासाठी मला भांडावं लागणार आहे.
तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांकडून जी कागदपत्रं मागण्यात आली ती आम्ही त्यांना दिलेली आहेत. तसेच आमची कुणाचीही चौकशी झालेली नाही. आमचे जबाब घेतलेले आहेत त्यात मी, माझा मुलगा मनीष जैन यांचे जबाब नोंदवले आहेत असं ईश्वरलाल बाबूजी जैन यांनी सांगितलं. सोन्यावर कर्ज घेतलं कर्ज घेतेवेळी चार टक्के व्याज लावण्यात आलं होतं त्यानंतर काही दिवसांनी थेट ते 18 टक्के व्याजदर लावण्यात आले. 14 टक्के व्याजदर हे जास्त लावण्यात आल्यामुळे मी जगायचं कसं? हाच माझा वाद स्टेट बँकेसोबत सुरू आहे अशी माहिती त्यांनी दिली.
काय माहिती दिली ईश्वरलाल बाबूजी जैन यांनी?
मी तडजोड करण्यासाठी त्यांना प्रपोजल दिलं होतं. हे कर्ज आहे, त्याची नऊ वर्षासाठी पुनर्बांधणी करा.. मी व्याजासहित पैसे भरायला तयार आहे. मात्र त्यांनी माझा हा प्रस्ताव धुडकावून लावला, माझी तडजोड सुद्धा त्यांना मान्य नाही. मी सांगत असल्या गोष्टी त्यांना मान्य नाही. त्यांना तडजोड मान्य नाही कारण त्यांनी काही ठिकाणी चुका केलेल्या आहेत. काही ठिकाणी ते फसलेले आहेत आणि या विरोधात माझा पुण्यातला मुलगा अमरीश याने त्यांच्यावर केसेस केलेले आहेत.
अमरीश यांनी ज्या केसेस केलेले आहेत त्या त्याने मागे घेतल्या पाहिजे तरच आम्ही तडजोड करू असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र केसेस मागे घेण्यासाठी अमरीश हा तयार नाही आणि त्यामुळे ते तडजोड करत नाहीत. त्यामुळे ठीक आहे, ते तडजोड करत नाहीत म्हणून काय झालं? जे व्हायचं आहे ते कायद्याने होईल. मात्र आज ही जी काही कारवाई झाली ती चुकीची आहे.
माझे तसेच मुलगा मनीष जैन आणि त्याची दोन्ही मुले अशा सर्वांचे जबाब घेण्यात आलेले आहेत. यानंतर त्यांनी आम्हाला समन्स बजावलेले आहेत. जेवढे दागिने आणि रोकड असा जो स्टॉक होता तो सर्व त्यांनी सील केला आहे.
ईडीने आमचा जबाब घेतला आहे आणि मी ईडीला जबाब दिलेला आहे. त्यांनी आम्हाला समन्स देखील दिले आहे आणि आम्ही चौकशीसाठी जाणार आहोत.
आमच्याकडे असलेले सर्व सोनं हे ईडीने ताब्यात घेतला आहे. ज्या फर्मवर ईडीने जप्तीची कारवाई केली आहे ती आर.एल.फर्म माझ्या दोन नातवांच्या नावावर आहे. त्यांचं बँकेच्या कर्जाशी काही देणंघेणं नाही म्हणून ही कारवाई चुकीची आहे.
ही कारवाई राजकीय दबावापोटी आहे की नाही ते मी नाही सांगणार. शरद पवारांच्या पाठीशी असल्याने कारवाई झाली का असे पत्रकारांनी जैन यांना विचारल्यानंतर माझे आणि शरद पवारांचे अनेक वर्षांपासून संबंध आहे अशी प्रतिक्रिया जैन यांनी दिली.
ही बातमीव वाचा: