(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jalgaon ED Raid : राजमल लखीचंद पेढीवरील ईडीचे छापे राजकीय हेतूने?
जळगावातील सुप्रसिद्ध पेढी राजमल लखीचंद ज्वेलर्स समूहावर ईडीच्या छापेसत्राने जळगावमध्ये खळबळ उडालीय. अशातच ही कारवाई राजकीय हेतूने झाली की काय, अशीही शंका व्यक्त केली जातेय. कारण या ज्वेलर्सचे मालक आहे ईश्वरलाल जैन. हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार आहेत. शिवाय ईश्वरलाल जैन हे १० वर्षांहून अधिक काळ राष्ट्रवादीचे खजिनदार होते. तसेच जळगावातील राष्ट्रवादीच्या कार्यालयाची जागाही त्यांच्याच नावावर आहे. तर ईश्वरलाल जैन यांचे चिरंजीव मनीष जैन हे माजी आमदार आहेत. गुरुवार संध्याकाळपासून ईडीच्या जवळपास ६० अधिकाऱ्यांकडून राजमल लखीचंद ज्वेलर्सची कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर ईश्वरलाल जैन शरद पवारांसोबत आहेत तर मनीष जैन यांनी अजित पवारांना साथ दिलीय. त्यामुळे ईश्वरलाल जैन आणि मनीष जैन यांच्या अडचणीत वाढ झाल्याची चर्चा आहे.