भारतीय नाट्ययुगाचे प्रवर्तक अल्काझी यांचे निधन
इब्राहिम अल्काझी यांचा जन्म पुण्याचा. त्यांना नऊ भावंडं. 1947 मध्ये भारत-पाक फाळणीवेळी त्यांची इतर सर्व भावंडे पाकिस्तानात निघून गेली. मात्र अल्काझी यांनी भारतात राहण्याचा निर्णय घेतला.
मुंबई : सलग 15 वर्षे एनएसडी अर्थात राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे संचालक राहिलेले नाट्यप्रवर्तक, भारतीय नाट्याला मॉडर्न थिएटरची ओळख करून देणारे रंगधर्मी इब्राहिम अल्काझी यांचे वयाच्या 95 व्या वर्षी दिल्ली येथे निधन झाले. अल्काझी हे आज मनोरंजन सृष्टीत कार्यरत असलेल्या अनेक दिग्गजांचे गुरू मानले जातात. यात आवर्जून उल्लेख करायला हवा तो विजया मेहता, नसिरुद्दीन शाह, ओम पुरी, रोहिणी हट्टंगडी, ज्योती सुभाष, बी. जयश्री यांचा. त्यांच्या जाण्याने भारतीय नाट्यक्षेत्राचे द्रोणाचार्य हरपल्याची भावना व्यक्त होते आहे.
इब्राहिम अल्काझी यांचा जन्म पुण्याचा. त्यांना नऊ भावंडं. 1947 मध्ये भारत-पाक फाळणीवेळी त्यांची इतर सर्व भावंडे पाकिस्तानात निघून गेली. मात्र अल्काझी यांनी भारतात राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अल्काझी नाट्य क्षेत्रात कार्यरत झाले. 1940 आणि 1950 या दोन दशकांत त्यांनी नाट्यवर्तुळात अनेक प्रयोग केले. त्यांना प्रतिष्ठेचा असा बीबीसी ब्रॉडकास्टिंग एवॉर्डही देण्यात आला. परंतु 1962 मध्ये त्यांनी राष्ट्रीय नाट्य विद्यालयाची धुरा आपल्या घांद्यावर घेतली. सलग 15 वर्षं त्यांनी संचालकपदी काम केलं. इतका प्रदीर्घ काळ पदावर असणारे अल्काझी एकमेव आहेत. या काळात त्यांनी जवळपास 50 पेक्षा जास्त अजरामर नाटकं केली. यात आवर्जून उल्लेख करायला हवा तो तुघलक, अंधायुग, आषाढ का एक दिन आदी नाटकांचा.
नाटकाला प्रोसेनियमची ओळख अल्काझी यांनी करून दिली. त्यांचे नाट्यक्षेत्रातील अपूर्व योगदान लक्षात घेऊन त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पुरस्कारांनी गोरवण्यात आलं आहे. शिवाय, प्रतिष्ठीत संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार त्यांना दोनदा लाभले. त्यापही पलिकडे त्याचे अमूल्य योगदान लक्षात घेऊन त्यांना संगीत नाटक अकादमीची फेलोशिप प्रदान करण्यात आली.
त्यांच्या निधनाची बातमी आल्यानंतर नाट्यक्षेत्रातल्या अनेक नामवंत मंडळींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. एनएसडीचे माजी संचालक वामन केंद्रे, लेखक अभिराम भडकमकर, रोहिणी हट्टंगडी यांपासून एनएसडीतून बाहेर पडलेल्या प्रत्येक स्नातकाने त्यांना आज श्रद्धांजली वाहिली.