ड्राफ्ट म्हणजे कच्चा मसुदा, मग मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवला कसं म्हणणार ? खुद्द शाहू महाराजांनी संभाजीराजेंना खडसावलं
संभाजीराजे यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शब्द फिरवल्याची टीका केली होती. आता त्यांचे वडिल छत्रपती शाहू महाराज यांनी संभाजीराजे छत्रपती यांना खडे बोल सुनावले आहेत.
कोल्हापूर : संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द फिरवल्याची टीका केली होती. आता त्यांचे वडिल छत्रपती शाहू महाराज यांनी संभाजीराजे छत्रपती यांना खडे बोल सुनावले आहेत. छत्रपती घराण्याचा अपमान याचा प्रश्न येत नाही, हे राजकारण आहे. माझ्यापर्यंत आला असता तर विषय वेगळा असता, पण तसं काही झालेलं नाही. उमेदवारी नाकारली याच्याशी घराण्याचा संबंध आला नाही. त्यांना व्यक्तिगत उमेदवारी नाकारली असेही शाहू महाराज यांनी म्हटले आहे.
भाजपनं दिलेल्या खासदारकीला माझा विरोध होता
राजेंना उमेदवारी नाकारण्यावरून सुरु असलेल्या चर्चेवरुन शाहू महाराज यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना संभाजीराजेंना खडसावलं आहे. ते म्हणाले की, आमच्यामध्ये काही विचार विनमय झाला असता किंवा मी सहमती दिली असती, नसती पण तसं काही झालं नाही. छत्रपती घराण्याचा निर्णय वैगेरे वेळोवेळी सांगत आले, पण त्यांचे निर्णय हे सगळे व्यक्तिगत होते. घराण्याचा नव्हे म्हणजे मला विचारलेलं नाही, किंवा माझी समंती घेऊन पावलं उचलली असं झालं नाही. 2009 सालापासून संभाजीराजे यांनी वाट वेगळी पकडली. भाजपनं दिलेल्या खासदारकीला माझा विरोध होता, पण शेवटी लोकशाही आहे. त्यावेळी देखील चर्चा झाली नाही. त्यांनी निर्णय घेतल्यानंतर मला सांगितलं होतं.
राज्यसभेवर जाण्यावरून त्यांनी कल्पना दिली नाही
राज्यसभेवर जाण्याबाबत संभाजीराजे यांचे जानेवारीपासून प्रयत्न सुरु होते, पण त्याची कल्पना काही दिली नव्हती. खासदारकी टर्म संपल्यानंतर ते फडणवीस यांच्याकडे गेले. अर्धा तास त्यांची भेट झाली. त्यामध्ये काय बोलणं झालं माहित नाही, पण काहीतरी बोलले असतील. पण लगेच तेथून बाहेर पडल्यावर त्यांनी पक्षाची घोषणा केली आणि अपक्ष राहणार म्हणून घोषणा केली.
इतर नेत्यांची भेट घ्यायला हवी होती
त्यांना पाठिंबा हवा होता, तर इतर नेत्यांकडे सुद्धा जाणं गरजेचं होतं. तसा प्रयत्न केला पाहिजे होता. राज्यसभेसाठी गणित जुळवून आणता पक्ष घोषित करणं हा निर्णय चुकला. ज्यांच्याकडे मत जास्त आहेत त्यांच्याकडे ते गेले नाहीत. शेवटी लोकशाही आहे, त्यात काय चालतं हे सगळ्यांना माहीत आहे. कुठं घोडं अडतंय हे त्यांना माहीत असायला पाहिजे होतं असे त्यांनी नमूद केले.
स्वराज्य पक्ष मोठा केला तर एक राज्यसभा कशाला चार राज्यसभा मिळतील
स्वराज्य पक्ष स्थापन करायचा होता, तर तुम्हाला कुणाकडे जायची गरज नव्हती. राज्यसभा पाहिजे होती तर भाजपला भेटला त्याप्रमाणे महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटायला पाहिजे होतं. दोन ते तीन महिन्यांपासून ही प्रक्रिया सुरु करायला पाहिजे होती. स्वराज्य पक्ष मोठा केला तर एक राज्यसभा कशाला चार राज्यसभा मिळतील, असेही राजे म्हणाले.
2016 साली राज्यसभेत गेले त्यावेळी मला फक्त जाणार आहे असं सांगितलं होतं. विचार विनिमय माझ्याबरोबर केला असता. इतिहासकार होते...पवार साहेब होते यांच्यावर विचार विनिमय केला पाहिजे होता. कुणाशी चर्चा केली तर ती चुकीची नसते. निर्णय घेतल्यावर मला सांगायचे. विचार विनिमय करायला माझ्याकडे कधी आले नाहीत.
फडणवीसांनी काय सल्ला दिला माहीत नाही
फडणवीस यांना भेटायला गेल्यानंतर त्यांनी काय सल्ला दिला माहीत नाही. तुम्ही अपक्ष राहिला तर आम्ही पाठिंबा देतो असं कदाचित सुचवलं असेल. फडणवीस यांना भेटून आल्यानंतर लगेच घोषणा केली. आपण घोषणा केल्यानंतर सगळे आपल्याकडे पाठिंब्यासाठी धावून येतील हा अंदाज चुकला. राजकारणामध्ये असं एकदम होत नाही. विचारविनिमय अनेक प्रकारचे असतात. छत्रपती घराण्याला पाठिंबा द्यायचा की नाही ? हा प्रश्न नव्हता तर संभाजीराजे यांना पाठिंबा द्यायचा की नाही ? हा प्रश्न होता. ऑटोमेटिक सर्व झालं पाहिजे हे सगळं चुकीचं आहे.
संजय पवारांचे अभिनंदन
संजय पवार यांना उमेदवारी मिळाल्यावर फोन करून अभिनंदन केल्याचे शाहू महाराज यांनी सांगितले. संजय पवार यांना आधीच संधी मिळायला हवी होती असेही त्यांनी नमूद केले.