Success Story : लहानपणीच आई- वडिलांचे छत्र हरपले; तरीही कठीण परिस्थितीत गाठले यशाचे शिखर
Hingoli Success Story : एमबीबीएसमध्ये प्रवेश मिळावा यासाठी सर्वजण प्रयत्न करत असतात. त्यासाठी महागडे कोचिंग क्लासेस आणि लाखो रुपये खर्च केले जातात.
Hingoli Success Story : एमबीबीएसमध्ये प्रवेश मिळावा यासाठी सर्वजण प्रयत्न करत असतात. त्यासाठी महागडे कोचिंग क्लासेस आणि लाखो रुपये खर्च केले जातात. तरीही अनेकांना MBBSला प्रवेश मिळत नाही. पण हिंगोलीतील एका मुलाने क्लासेस न लावता स्वत: अभ्यास करत यश मिळवले आहे. लहानपणीच आई- वडिलांचे छत्र हरवले होते, अशा कठीण परिस्थितीसमोर खचून न जाता संघर्षाचे पंख जोडत यश मिळवले आहे. केवळ जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यानं MBBSला प्रवेश मिळवला आहे. कैलास ढोकर असे त्या यश मिळवणाऱ्या मुलाचे नाव आहे.
कैलास ढोकर लहान असताना आई-वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर आलेल्या कठीण परिस्थितीवर त्याने मात केली. परिस्थिती नसल्यामुळे पुण्यासारख्या शहरातही त्याला जाता येत नव्हते. क्लासेसही लावता येत नव्हते. पण कैलास ढोकरने आपला आत्मविश्वास ढासळू दिला नाही. जिद्द आणि चिकाटीने परिस्थितीवर मात केली.
कैलास ढोकर हा मुलगा मूळचा वरुड काजी येथील रहिवासी आहे. बालपणीच कैलासच्या डोक्यावरील आई-वडिलांचे छत्र हरवले. अनाथ झालेल्या कैलासला त्याच्या काकांनी सांभाळले. प्राथमिक माध्यमिक शिक्षण वरुड काजी येथे पूर्ण झाले. परभणी येथून महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर कैलास ने नीट परीक्षेचा अभ्यासक्रम सुरू केला, परंतु आर्थिक अडचणीमुळे कैलासला मागील वर्षी नीट परीक्षा देणे शक्य झाले नाही. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने कैलासने आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी नाशिक येथे कंपनीत काम करायचं ठरवलं. कैलास नाशिक येथे गेलाही, कंपनीत कामाला सुरुवात केली. कैलासच्या शैक्षणिक गुणवत्तेबद्दल सेवासदनला माहिती मिळताच सेवासदनच्या वतीने मीराताई धनराज कदम यांनी संपर्क साधून कैलासला विना अट सेवासदनमध्ये येण्यास विनंती केली. इथे तू अभ्यास कर, इथे आम्ही सर्व मदत करू, या आश्वासनामुळे कैलासनेही होकार दर्शवला.
कैलासला लागणारी सर्व पुस्तके साहित्य सामग्री सेवासदनच्या वतीने देण्यात आली. तब्बल एक वर्ष जिद्द आणि चिकाटीने मेहनत केल्यानंतर कैलास यावर्षी 441 गुण घेत नीट परीक्षा उत्तीर्ण झाला. चांगले गुण मिळाल्यामुळे कैलासला बी एच एम एस साठी प्रवेश मिळणे शक्य होते. मात्र त्याला जर अनाथ प्रमाणपत्र मिळाले, तर एम बी बी एस प्रवेशासाठी कैलास पात्र ठरू लागला. हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी हिंगोली जिल्ह्यातील अनाथ प्रमाणपत्र कैलासला दिले. कैलासचा मुंबई येथे वैद्यकीय अभ्यासासाठी एमबीबीएस साठी प्रवेश निश्चित करण्यात आला आहे.