(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दिलासादायक! देशात मान्सूनचा मुक्काम वाढला, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये पडणार जोरदार पाऊस, हवामान विभागानं वर्तवला पुढचा अंदाज
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, 'ला' निनाच्या प्रभावामुळं यावर्षी मान्सूनचा (Monsoon) मुक्काम वाढणार आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
India Weather News : यंदा देशातील बहुतांश भागात चांगला पाऊस (Heavy Rain) झाला आहे. काही ठिकाणी जनजवीन विस्कळीत देखील झालं आहे. चांगल्या पावसामुळं नदी नाले धरणांच्या (Dam) पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, 'ला' निनाच्या प्रभावामुळं यावर्षी मान्सूनचा (Monsoon) मुक्काम वाढणार आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
ला निनामुळं कमी दाबाचा पट्टा, त्यामुळं जोरदार पावसाची शक्यता
दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनचा परतीचा प्रवास सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत लांबण्याची चिन्हे दिसत आहेत. ला निनामुळं कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे, त्यामुळं सप्टेंबर महिन्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतात जून महिन्यात मान्सूनचे आगमन होते आणि सप्टेंबर महिन्यात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होतो. ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत संपूर्ण भारतातून मान्सून परततो. देशातील जवळफास निम्मी शेतजमीन ही जून ते सप्टेंबर या कालावधीत पडणाऱ्या पावसावर अवलंबून आहे.
पावसामुळं पिकांच्या उत्पादनावर परिणाम होणार
सप्टेंबरमध्ये होणाऱ्या पावसामुळं सोयाबीन, मका, कापूस यासारख्या पिकांच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. तर जमिनीत ओलावा राहून खरीप हंगामातील गहू, हरभरा या पिकांना त्याचा फायदा होऊ शकतो. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी भारतात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. सरासरीपेक्षा देशात आत्तापर्यंत 7 टक्के पाऊस अधिक झाला आहे.
आज कसं असले महाराष्ट्रातील राज्यातील हवामान?
गेल्या काही दिवसापासून राज्यात चांगला पाऊस होत आहे. बहुतांश जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आजही राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आजही पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच अहमदनगर जिल्ह्याला देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर संपूर्ण विदर्भात देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. आज या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असं अवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या: