गुजरातमध्ये पुराचा हाहाःकार; आतापर्यंत 30 जण दगावले, दिल्ली-एनसीआरमध्येही मुसळधार
Gujarat Rains: दिल्ली-एनसीआरमध्येही पावसानं धुमाकूळ घातला आहे. बुधवारी संध्याकाळपासूनच दिल्ली एनसीआरमधील परिस्थिती हाताबाहेर गेली होती.
Gujarat Rain Updates : नवी दिल्ली : एकीकडे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसानं दडी मारली आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात मे महिन्याप्रमाणे उकाडा सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे गुजरातमध्ये मात्र मुसळधार पावसानं हाहाकार उडवला आहे. गुजरातमध्ये मुसळधार पावसानं नागरिकांची भंबेरी उडवली आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 30 वर पोहोचली आहे. तर, अनेक सखल भागांत पाणी साचलंच आहे. तसेच, पूरग्रस्त भागांतील 17 हजार 800 लोकांना सुरक्षित स्थानी हलवण्यात आलं आहे.
दिल्ली-एनसीआरमध्ये मुसळधार पावसाचा कहर
दिल्ली-एनसीआरमध्येही (Delhi) पावसानं धुमाकूळ घातला आहे. बुधवारी संध्याकाळपासूनच दिल्ली एनसीआरमधील परिस्थिती हाताबाहेर गेली होती. गुरुवारीही दिल्लीत पावसाचा जोर कायम असल्याचं पाहायला मिळालं. ठिकठिकाणी पाणी साचलं होतं. तसेच, हवामान विभागानं पुढील काही दिवस वातावरण असंच राहणार असून मुसळधार पाऊस कोसळू शकतो, असं सांगितलं आहे.
गुजरातमध्ये हवाईदलाची मदत
प्रशासन, एनडीआरएफ, एसडीआरएफ, सेना, भारतीय हवाई दल आणि भारतीय तट रक्षक दलांच्या मदतीनं गुजरातमध्ये बचाव कार्य सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना फोन करून गुजरातमधील पूरपरिस्थितीचा आढावा घेतला.
मुसळधार पावसाचा इशारा
हवामान खात्यानं पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. गुरुवारी 11 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट तर 22 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अहमदाबाद, जामनगर, देवभूमी द्वारका, पंचमहाल, अरवली, डांग, सुरेंद्रनगर, दाहोद, खेडा, भरूच, आनंद, महिसागर, वडोदरा, गांधीनगर आणि मोरबी येथील मृतांची नावे आहेत.
गुजरातच्या मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांची चर्चा
सलग तिसऱ्या दिवशी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गांधीनगर येथील आपत्ती नियंत्रण कक्षात उच्चस्तरीय बैठक घेऊन जिल्हा अधिकारी, महापालिका आयुक्त आणि विकास अधिकाऱ्यांसोबत परिस्थितीचा आढावा घेतला. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी इंटरनेट मीडिया प्लॅटफॉर्मवर पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या चर्चेची माहिती दिली. मुख्यमंत्री पटेल म्हणाले की, गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या सद्यस्थितीबाबत त्यांनी पंतप्रधान मोदींशी फोनवर चर्चा केली.
राहुल गांधींकडून चिंता व्यक्त
अमरेलीमध्ये बुधवारी मालगाडीच्या लोको पायलटनं आपत्कालीन ब्रेक लावून रेल्वे ट्रॅकवर बसलेल्या पाच सिंहांचे प्राण वाचवले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुजरातमधील पूरस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आणि नैसर्गिक आपत्तीचा प्रभाव कमी करण्यासाठी सरकारने आवश्यक ती पावले उचलण्याची विनंती केली.