Maharashtra Rain : राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस, भंडाऱ्यासह जळगाव जिल्ह्याला पुराचा फटका
जळगाव आणि भंडारा जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झाला आहे. या पावामुळं नदीला पूर आल्यानं जिल्ह्यातील काही भागांमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे.
Maharashtra Rain : हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या विविध भागात पावसानं हजेरी लावली आहे. काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला तर काही ठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळं काही ठिकाणी नदी नाल्यांना पूर आले आहेत. जळगाव आणि भंडारा जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झाला आहे. या पावामुळं नदीला पूर आल्यानं जिल्ह्यातील काही भागांमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे. त्यामुळं नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे.
हतनूर धरणनाचे पाणी रावेर आणि मुक्ताईनगर तालुक्यातील काही गावात शिरलं
जळगाव जिल्ह्यात हतनूर धरणनाचे बॅक वॉटर रावेर आणि मुक्ताईनगर तालुक्यातील काही गावात शिरलं आहे. या गावातील काही लोकांना प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. महाराष्ट्रासह मध्य प्रदेशात झालेल्या दमदार पावसानं जळगाव जिल्ह्यात तापी आणि पूर्णा नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. त्याचा परिणाम म्हणून हतनूर धरणाचे बॅक वॉटर पाणी रावेर आणि मुक्ताईनगर तालुक्यातील काही गावात शिरल्याने या गावातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
जळगाव जिल्ह्यात कालपासून तापी आणि पूर्णा नदी पात्रात पाण्याची मोठी आवक वाढली असल्यानं हतनूर धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत.
मात्र, अजूनही मोठ्या प्रमाणात मध्य प्रदेशातून पाण्याची आवक नदीमध्ये होत असल्यानं हतनूर धरणाचे पाणी जळगाव जिल्ह्यात रावेर तालुक्यात खिरवाड, निंबोल, एनपूर, धूर खेडा, नुंभोरा सिम या गावात शिरल्यानं या भागातील पिकांचं नुकसान झालं आहे. काही घरात पाणी शिरल्याने घरातील साहित्याचंही नुकसान झालं आहे. दरम्यान, पुराच्या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर मुक्ताईनगर तालुक्यात देखील अशाच पद्धतीनं पाणी गावात शिरल्यानं खडकी, मेधोडे, भोक्री, पटोंडी या ठिकाणी असलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे. पुराचं पाणी शेतात शिरुन पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. आजपासून ई पीक पंचनामे करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. या घटनेनंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे रावेर आणि मुक्ताईनगर तालुक्यातील पूरग्रस्त भागात तळ ठोकून आहेत. पूर परिस्थितीवर नियत्रंण मिळवण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा हाय अलर्ट मोडवर असल्याचं पाहायला मिळत आहे.
भंडारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस, वैनगंगा नदीला पूर
गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळं वैनगंगा नदी ओसंडून वाहू लागली आहे. मध्य प्रदेशातील संजय सरोवर, गोंदियातील धापेवाडा धरणाचे पाणी वैनगंगा नदीत प्रवाहित होत आहे. यामुळं वैनगंगा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. दुथडी भरुन वाहणारी वैनगंगा नदी आणि गोसीखुर्द धरणाच्या बॅक वॉटरमुळं भंडारा शहराला पुराचा फटका बसला आहे. शहरातील अनेक सखल भागात पुराचं पाणी शिरल्यानं अनेक कुटुंबाला सुरक्षितस्थळी हलविण्यात आलं आहे. तर पूर परिस्थिती हाताळण्यासाठी NDRF चं पथक बोलविण्यात आलं आहे. या पूर परिस्थितीमुळे जिल्ह्यातील विविध 17 मार्ग बंद झालेत. यासोबतच भंडारा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रातही पुराचं पाणी शिरल्यानं शहरासह जिल्हा सामान्य रुग्णालयाचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे.
धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ
एक महिन्याच्या खंडानंतर पाऊस विदर्भावर अखेर मेरहबान झाला आहे. विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यात पावसाने पुन्हा कमबॅक केल्याने शेतकऱ्यांना तर दिलासा मिळलाच पण पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मिटला आहे. दोन दिवसांपासून विदर्भातील नागपूर, भंडारा, अमरावती जिल्ह्यात चांगलाच पाऊस बरसला आहे.. यात सर्वाधिक फटका भंडारा जिल्ह्याला बसला आहे. या पावसामुळे विदर्भातील जलसाठ्यात वाढ झाली आहे. नागपूर विभागात 76 टक्के जलसाठा असून अमरावती विभागात 75 टक्के जलसाठा सध्या धरणात आहे. याचबरोबर नंदुरबार, वर्धा या जिल्ह्यातही जोरदार पावसानं हजेरी लावली.