Gulabrao Patil : "एकनाथ शिंदे सोबत होते तेव्हा साधुसंत वाटायचे, आता गुंड वाटतात"; गुलाबराव पाटलांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर
Gulabrao Patil : पुण्यातील गुंड निलेश घायवळ आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीच्या फोटोवरून खासदार संजय राऊत यांनी शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला. यावर गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
Gulabrao Patil : पुण्यातील गुंड निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या भेटीच्या फोटोवरून पुन्हा एकदा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महाराष्ट्रात गुंडाराज सुरुय, असे म्हणत शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला. या पार्श्वभूमीवर गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
गुलाबराव पाटील म्हणाले की, आज मी येथे आलो आहे. माझ्यासोबत कोण आहे हे मला माहित नाहीये. नेत्याबरोबर कोणता माणूस कोणत्या वृत्तीचा आहे हे काय कोणी तपासात बसत नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे हे आपल्या सोबत होते, तोपर्यंत ते आपल्याला साधूसंत वाटत होते. आता आपल्याला गुंड वाटत आहेत, असे प्रत्युत्तर त्यांनी संजय राऊत यांना दिले आहे.
ते वेगळ्या पक्षाचा चुकीचा निर्णय घेणार नाहीत
छगन भुजबळांचा आशीर्वाद घेऊन ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी ओबीसींचा नवीन पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला. यावरून छगन भुजबळांच्या भूमिकेबाबत गुलाबराव पाटलांना विचारले असता ते म्हणाले की, छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे मंडल आयोगापासून ओबीसीचे काम करत आहे. त्यांचा मार्ग हा ओबीसीचा मार्ग आहे. त्यामुळे त्यांना जे वाटतंय ते भुजबळ बोलत आहेत. मला तरी असे वाटते की ते वेगळ्या पक्षाचा चुकीचा निर्णय घेणार नाहीत. पण शेवटी ही भावना आहे. भावना म्हणजे कृती नाही. त्यांनी ती भावना व्यक्त केलेली आहे. ती कृतीमध्ये येईल त्यावेळेस आपण बोलणे उचित होईल, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.
विजय वडेट्टीवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
विजय वडेट्टीवार यांनी आज एक्सवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात निलेश घायवळसह काही जण मंत्रालयात फिरताना व्हिडिओ बनवत आहे. यावरून विजय वडेट्टीवार यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर (Maharashtra Government) जोरदार निशाणा साधला आहे.
गुंडांना रिल्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले केल्याबद्दल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अभिनंदनास पात्र आहे. राज्यातील गुंडांचे इतके अच्छे दिन आलेत की महायुती सरकारच्या काळात ते मंत्रालयात AC ची हवा घेत आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून येणारा सामान्य माणूस मंत्रालयाबाहेर दिवसभर रांगेत उभा आहे. पेपरफुटी विरोधात तरुण तरुणी रस्त्यावर आंदोलन उपोषणात आपले आयुष्यातील महत्वाचे दिवस घालवत आहे. नागपुरात आदिवासी बांधव आपल्या मागण्यासाठी अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहे आणि इकडे सरकार गुंडांना रिल्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले करून देत आहे. हीच का ती "मोदी की गॅरंटी"?, अशी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक्सवर म्हटले आहे.
आणखी वाचा