जेजुरी मुख्य मंदिरावर सोन्याचा कळस बसवणार
खंडोबाच्या मुख्य मंदिरावर सोन्याचा कळस बसवण्यात येणार आहे. यासाठी दीड किलो शुद्ध सोन्याचा वापर केला जाणार आहे.
पुणे : महाराष्ट्राचं कुलदैवत असेलेल्या खंडोबाच्या जेजुरीला 'सोन्याची जेजुरी' म्हटलं जातं. ती जेजुरी आता खऱ्या अर्थानं सोन्याची होणार आहे. जेजुरीच्या खंडोबाच्या मुख्य मंदिरावर सोन्याचा कळस बसवण्यात येणार आहे. यासाठी दीड किलो शुद्ध सोन्याचा वापर केला जाणार आहे.
खंडेरायाच्या मंदिराला सोन्याचा कळस बनवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. देवस्थानच्या वतीनं धार्मिक विधी करत या कामाचा प्रारंभ करण्यात आला आहे. खंडोबा देवस्थानच्या ताब्यात असलेल्या सोन्याचे विविध अलंकार आणि चीज वस्तूंमधून मुख्य मंदिरावरील कळस सोन्याचा तयार करण्यात येणार आहे.
दीड किलो शुद्ध सोन्याचा यासाठी वापर करण्यात येणार असून राजस्थानवरुन कुशल कारागीर बोलवण्यात आले आहेत. आठवडाभर कॅमेऱ्याच्या देखरेखीखाली हे काम चालणार आहे. पुरातन काळापासून खंडेरायाची जेजुरी सोन्याची नगरी म्हणून प्रचलित आहे. तेच सार्थ करण्यासाठी मुख्य मंदिराच्या कळसापासून शुभारंभ करण्यात येत आहे.
राज्यातील आणि देशातील भक्तांनी खंडोबाला अर्पण केलेल्या विविध सोन्याच्या अलंकारातून शुद्ध सोनं तयार करून हे काम करण्यात येत आहे. पुढील आठवड्यात होणारी सोमवती यात्रा आणि त्यानंतर नवरात्र व दसरा उत्सव असल्याने त्यापूर्वी हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.