Ganesh Visarjan 2024 : भिवंडीतील 22 फूट उंच गणेश मूर्तीच्या विसर्जनात अतिक्रमणामुळे अडथळे, मार्ग बदलण्याची वेळ
Ganesh Visarjan 2024 : भिवंडीतील 22 फूट उंच गणेश मूर्तीच्या विसर्जनात अतिक्रमणामुळे अडथळे येणार असल्याने मिरवणुकीचा मार्ग बदलण्याची वेळ उद्भवली आहे.
भिवंडी : गेल्या दहा दिवसांपासून विराजमान झालेल्या श्रीगणेशाला (Ganpati Bappa Morya) आज भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात येत आहे. लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ झालाय. तर मुंबईतील इतर विसर्जन मिरवणुकांना देखील सुरुवात झाली आहे. त्यात आता भिवंडीतील (Bhiwandi) 22 फूट उंच गणेश मूर्तीच्या विसर्जनात अतिक्रमणामुळे अडथळे येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
भिवंडी येथील टिळक चौक ब्राह्मणआळी परिसरातील श्री वरद विनायक मित्र मंडळाने यावर्षी तब्बल 22 फूट उंच गणेश मूर्ती मंडळातच साकारली आहे. विसर्जनाच्या वेळी मूर्ती विसर्जन मार्गावर अतिक्रमण आहे. तसेच विद्युत तारांमुळे देखील अडथळे निर्माण झाले आहेत. विशेष म्हणजे, मूर्ती 22 फूट उंच असल्याची कल्पना असतानाही महानगरपालिका, पोलीस आणि सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाने विसर्जन मार्गावर योग्य व्यवस्था केली नाही.
मिरवणूक मार्ग बदलण्याची वेळ
मिरवणूक मार्गावरील अतिक्रमण हटवण्यात आलेले नाही. ज्यामुळे मंडळासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. यावर उपाय म्हणून पोलिसांनी मंडळाला मार्ग बदलून विसर्जन घाटापर्यंत नेण्याचा किंवा जागेवरच विसर्जन करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मूर्तीची मिरवणूक नेहमीच्या मार्गानेच काढण्याचा हट्ट धरला आहे. या अडथळ्यांसाठी महानगरपालिका आणि विद्युत पुरवठा कंपनी जबाबदार असल्याचे मंडळाचे म्हणणे आहे. आता यावर नेमका काय तोडगा निघणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
यंदा गणपती विसर्जन लवकर होणार?
दरम्यान, मुंबईतील बहुतांश बड्या मंडळांच्या गणपतीचे (Mumbai Ganesh Idols) विसर्जन गिरगाव चौपाटीवर होते. हे विसर्जन दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत सुरु असते. मात्र, यंदा मुंबईतील गणेश मंडळांच्या गणपतीचे विसर्जन (Ganesh Visarjan 2024) लवकर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण मंगळवारी रात्री 11 च्या सुमारास समुद्राला मोठी भरती येणार आहे. ही भरती बराच काळ राहील. त्यामुळे या काळात समुद्रात जाणे धोक्याचे ठरेल. लालबागचा राजा, मुंबईचा राजा आणि काही मोजके गणपती विसर्जनासाठी तराफ्यावर ठेवून खोल समुद्रात नेले जातात. अन्य मंडळांचे कार्यकर्ते गणपतीची मूर्ती उचलून विसर्जनासाठी समुद्रात नेतात. समुद्रात मोठी भरती आल्यास विसर्जन करणे शक्य होणार नाही. त्यामुळे अनेक सार्वजनिक मंडळे रात्री 11 पूर्वी गणेशमूर्तीचे विसर्जन करु शकतात.
इतर महत्त्वाच्या बातम्या