(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lalbaugcha Raja: लालबागचा राजाच्या चरणांपाशीची ती चिठ्ठी चर्चेत, सुधीर साळवींना ठाकरे गटाची उमेदवारी, अजय चौधरींचा पत्ता कट होणार?
Lalbaugcha Raja Visarjan 2024: शिवडीत ठाकरेंकडून अजय चौधरी की सुधीर साळवी?; उमेदवारी जाहीर होण्याआधीच समर्थकांकडून प्रचार. लालबागचा राजाच्या पायांवरील चिठ्ठीने चर्चांना उधाण. शिवडी विधानसभेचं राजकारण बदलणार
मुंबई: दहा दिवसांचा पाहुणचार घेतल्यानंतर अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर लालबागचा राजा मंगळवारी सकाळी विसर्जनासाठी मंडपातून निघाला आहे. यापूर्वी मंडपातील कार्यकर्ते आणि अन्य भक्तांनी डोळे भरुन राजाचे दर्शन घेतले. लालबागचा राजाचा (Lalbaugcha Raja Visarjan 2024) मंडपात विसर्जन मिरवणुकीची लगबग सुरु असताना कोणीतरी गणपतीच्या पायावर एक चिठ्ठी आणून ठेवली. ही चिठ्ठी सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. या चिठ्ठीमुळे आगामी विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचा उमेदवार कोण असणार, याची चर्चा सुरु झाली आहे.
लालबागचा राजाच्या पायाशी ठेवलेल्या या चिठ्ठीमुळे आगामी काळात लालबाग परिसरातील राजकारणाचा पट नव्याने मांडला जाऊ शकतो. लालबागचा परिसर हा शिवडी विधानसभा मतदारसंघात येतो. ठाकरे गटाचे अजय चौधरी (Ajay Chaudhari) हे सध्या शिवडीचे आमदार आहेत. मात्र, लालबागच्या राजाच्या पायाशी ठेवलेल्या चिठ्ठीत सुधीर साळवी (Sudhir Salvi) 2024 ला आमदार होऊ दे, असे लिहण्यात आले होते. साळवी समर्थकांकडून लालबागच्या राजाच्या चरणी ही चिठ्ठी ठेवण्यात आल्याचे समजते. 'शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवडी विधानसभा 2024 आमदार... सुधीर (भाऊ) साळवी', असा मजकूर या चिठ्ठीत लिहण्यात आला आहे.
आज पहाटे सुधीर साळवी समर्थकांकडून राजाच्या चरणी ही चिठ्ठी ठेवण्यात आल्याचे सांगितले जाते. शिवडी विधानसभेमध्ये सध्या अजय चौधरी ठाकरे गटाकडून आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्याशी इमान कायम राखणाऱ्या आमदारांमध्ये अजित चौधरी यांचा समावेश होता. अजय चौधरी यांच्यासह सुधीर साळवी देखील शिवडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. लालबागचा राजा सार्वजनिक मंडळाचे सचिव असल्यामुळे लालबाग परिसरात सुधीर साळवी यांना मानणारा मोठा वर्ग आहे. काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी लालबागचा राजाचे दर्शन घेतले होते. त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाकडून अजय चौधरी आणि सुधीर साळवी यांच्यापैकी कोणाला उमेदवारी दिली जाणार, हे पाहावे लागेल. सुधीर साळवी हे शिवडी विधानसभा संघटक, दक्षिण मुंबई लोकसभा समन्वयक म्हणून ठाकरे गटाकडून काम करत आहेत. तर लालबागच्या राजाचे मानद सचिव देखील सुधीर साळवी आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
विधानसभा निवडणूक दिवाळीनंतर?
राज्यातील विधानसभेच्या निवडणुकांसाठीची घोषणा पुढील महिन्यात पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. तर नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात दिवाळी संपल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान आणि मतमोजणी पार पडेल, असे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुका 12 ते 18 नोव्हेंबर दरम्यान होईल, आणि 1999 नंतर पहिल्यांदाच राज्यात दोन टप्प्यात मतदान होईल. आता, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना माहिती दिली होती.
आणखी वाचा
'निरोप घेतो देवा, आता आज्ञा असावी...'; लालबागच्या राजाची शेवटची आरती, मंडपातील कार्यकर्ते भावूक