गडकरी रंगायताला दिवाळीपर्यंत टाळेच!
महाराष्ट्रात 22 ऑक्टोबरपासून नाट्यगृह सुरू होणार आहे. मात्र, ठाणे महापालिकेच्या 'लेट लतीफ' कारभारामुळे गडकरी रंगायतनमध्ये नाटकाची तिसरी घंटा वाजणारच नाही.
ठाणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर मराठी नाट्यप्रेमींकडून नाट्यगृहे उघडण्याची वाट पाहिली जात असतानाच, ठाणे महापालिकेच्या 'लेट लतीफ' कारभारामुळे गडकरी रंगायतनमध्ये नाटकाची 22 ऑक्टोबरला तिसरी घंटा वाजणारच नाही. कारण अजूनही या नाट्यगृहांची डागडुजी करण्याचे काम पूर्ण झालेले नाही इतकच काय तर नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत काम सुरू राहणार असल्याने दिवाळी पहाट कार्यक्रम निखिल गडकरी रंगायतनला होणार नाहीत. त्यामुळे ठाण्यातील कलाप्रेमी आणि कलाकार नाराज झाले असून भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी देखील पालिकेच्या ढिसाळ कारभारावर टीका केली आहे.
ठाणे शहराचे सांस्कृतिक प्रतीक म्हणून गडकरी रंगायतनची ओळख आहे. 1978 पासून मासुंदा तलावाच्या काठी असलेले गडकरी रंगायतन ठाण्याची ओळख आहे. ठाणेकरांची नाटक पाहण्यासाठी पहिली पसंती गडकरी रंगायतनलाच असते. मात्र, उद्यापासून सर्वत्र नाट्यगृह सुरू होत असतानाच गडकरी रंगायतनचा पडदा महिनाभर उघडणार नाही आणि तिसरी घंटाही वाजणार नाही. ठाणे महापालिकेने गडकरी रंगायतनच्या दुरुस्तीचे काम काढले असून, ते आणखी महिनाभर सुरू राहणार आहे. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी पहाटच्या कार्यक्रमांबरोबरच रसिकांना नाटकालाही मुकावे लागणार आहे, अशीही टीका निरंजन डावखरे यांनी केली आहे.
इतके महिने नाट्यगृहे बंद असताना महापालिकेने दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याची अपेक्षा होती. मात्र, आता नाट्यगृह सुरू होण्यापूर्वी गडकरी रंगायतनची दुरुस्ती करण्याचे काम सुरू केले आहे. महापालिकेच्या या कारभाराचा नाहक त्रास नाट्यरसिकांना होणार आहे. मात्र "गडकरी रंगायतानाची डागडुजी वेळोवेळी होत असते, सध्या जी डागडुजी सुरू आहे ती अत्यावश्यक असल्याने त्वरित हातात घेण्यात आली, येत्या 15 दिवसात नाट्यगृह पुन्हा सुरू करू", असे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी सांगितले आहे.
अनेक महिने आंदोलन केल्यानंतर राज्य सरकारने नाट्यगृह खुल करण्यास परवानगी दिली. त्यासाठी 22 तारखेचा मुहूर्त ठरवला गेला. मात्र ठाणे महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे नाट्यरसिकांना सोबत नाट्य कलावंतांचा देखील हिरमोड झाला आहे. विशेषतः सत्ताधाऱ्यांनी देखील याकडे दुर्लक्ष केले आहे.