Gadchiroli : गडचिरोलीची पहिली टॅक्सी ड्रायव्हर किरण कुर्मावार अखेर इंग्लंडला रवाना, सर्व स्तरातून होतोय कौतुकाचा वर्षाव
Gadchiroli Kiran Kurmawar News : परदेशी विद्यापीठात प्रवेश मिळाल्यानंतर किरणची उच्च शिक्षणासाठी केवळ पैशाअभावी होणारी होलपट प्रथम एबीपी माझाने दाखवली होती.
मुंबई: गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यापासून जवळपास 70 किलोमीटर दूर असलेल्या रेगुंठा गावातील टॅक्सी ड्राईव्हर (Gadchiroli Taxi Driver) किरण कुर्मावार (Kiran Kurmawar) अखेर आपल्या पुढील उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला रवाना झाली आहे. किरण पुढील दोन वर्षे इंग्लंडमधील लीड्स विद्यापीठात (University of Leeds) एमएस्सी इन मार्केटिंग मँनेजमेंट या विषयाचा अभ्यास करणार आहे. परदेशी विद्यापीठात प्रवेश मिळाल्यानंतर किरणची उच्च शिक्षणासाठी केवळ पैशाअभावी होणारी होलपट प्रथम एबीपी माझाने दाखवली आणि त्यानंतर तात्काळ राज्य सरकारच्यावतीने किरणला 40 लाख रुपयांची शिष्यृवत्ती मंजूर करण्यात आली.
एबीपी माझाच्या बातमीनंतर दखल (ABP Majha Impact)
एबीपी माझाने सहा महिन्यांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील किरणच्या रेगुंठा गावात जाऊन किरणची परिस्थिती समोर आणणारा ग्राऊंड रिपोर्ट तयार केला. त्यानंतर या रिपोर्टची दखल घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी हा विषय पावसाळी अधिवेशनात मांडला. एबीपी माझाच्या बातमीची दखल घेऊन या विषयावर सचिन अहिर यांनी विधानपरिषदेत आदिवासी मुलीची शिक्षणासाठी होणारी हेळसांड याकडे सरकारचं लक्ष वेधलं. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किरणला मुंबईला बोलावून तिच्या अडचणी समजून घेतल्या. यानंतर तात्काळ सामाजिक न्याय विभागाला आदेश देत किरणला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर किरणचं परदेशी जाऊन उच्च शिक्षण घेण्याच स्वप्न पूर्ण झाल्याचं पाहायला मिळालं.
तीन वर्षांपासून टॅक्सी ड्राईव्हर म्हणून गडचिरोली जिल्ह्यात हजारो प्रवाशांना गाव खेड्यातून तालुक्याच्या ठिकाणी ने आण करणारी किरण कुर्मावार ही तरुणी आज त्या कामातून ब्रेक घेत नव्या प्रवासाला सुरुवात करतेय. किरणने काही वेळापुर्वीच आपल्या स्वप्नाच्या दिशेनं उंच भरारी घेतलीय आणि ती… pic.twitter.com/bBBrp3K4cC
— Nilesh Budhawale (@nileshbudhawale) September 20, 2023
याबाबत बोलताना किरणला मार्गदर्शन करणारे विशाल ठाकरे म्हणाले की, किरणची आणि त्यांची भेट ही एकलव्य संस्थेच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या एका मार्गदर्शन शिबिरात झाली होती. त्यानंतर किरणने आपणाला देखील उच्च शिक्षण घेण्याची इच्छा बोलून दाखवली. तोपर्यंत किरणला उच्च शिक्षणासाठी कोणत्या बाबी महत्त्वाच्या आहेत याची देखील माहिती नव्हती. अखेर एक वर्षाच्या मार्गदर्शनानंतर किरणने IELTS या परीक्षेची तयारी केली आणि त्यानंतर इंग्लंडमधील लीड्स विद्यापीठात किरणला उच्च शिक्षणासाठी संधी मिळाली.
उच्च शिक्षण घेण्याच्या आपल्या स्वप्नाबाबत बोलताना किरण म्हणाली की, एबीपी माझाने केलेल्या मदतीमुळे आज मी माझं उच्च शिक्षण माझं स्वप्न असणाऱ्या इंग्लंड येथील लीड्स विद्यापीठात पुर्ण होताना पाहत आहे. पुढील दोन वर्ष मी शिक्षण घेईल आणि त्यानंतर पुन्हा भारतात येईल. भारतात आल्यानंतर माझ्या सारख्या आदिवासी भागातून येणाऱ्या मुला-मुलींसाठी उच्च शिक्षण घेण्याच्या संधी त्यांना उपलब्ध करुन देण्याचं माझं स्वप्न असेल. माझ्या आतापर्यंच्या प्रवासात मला एबीपी माझा सोबतच समता सेंटरचे प्रवीण निकम, वैशाली जाधव, अमेरिकेतील आँस्टीन येथे पीएचडीचं शिक्षण घेणारे विशाल ठाकरे यांची खूप मदत झाली.
किरणची कौटुंबिक परिस्थिती कशी आहे? (Gadchiroli Taxi Driver Kiran Kurmawar)
आदिवासी बहुल रेगुंठा येथे उच्च शिक्षणाची सोय नाही. त्यामुळे किरणसह तिच्या दोन मोठ्या बहिणींनी हैदराबाद येथे उस्मानिया विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतले आहे. मोठ्या बहिणींपैकी एकीने रसायनशास्त्रात तर दुसरीने बायोटेक्नॉलॉजीमध्ये पदवी घेतली आहे. किरणने अर्थशास्त्रात एम.ए केल्यानंतर दिल्लीत एव्हिशनच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला होता. किरणला शिक्षणासाठी लागणारे पैसे तिचे वडील रमेश कुर्मावार आपल्या बोलेरो जीपमधून प्रवासी वाहतूक करुन जमा करत होते. परंतु त्याच कालावधीत तिच्या वडिलांचा अपघात झाला. त्यानंतर कुटुंबाची जबाबदारी किरणवर आल्यानं किरणने आपलं एव्हिएशन सोडून सिरोंचा गाठले आणि बोलेरोचे स्टिअरिंग हाती घेतले. त्यानंतर ती मागील पाच वर्ष रेगुंठा ते सिरोंचा अशी 70 किमी प्रवासी वाहतूक करत होती. नक्षलवाद्यांच्या सावटात जीप चालवून आत्मनिर्भर झालेल्या किरणचं त्यावेळी प्रचंड सर्वत्र कौतुक होत होतं. दुर्गम भागात जीप चालविण्याच्या किरणने केलेल्या धाडसाची नोंद त्यावेळी इंडिया बुक आँफ रेकाँर्ड्समध्ये देखील झाली होती.
ही बातमी वाचा: