
Long March : शेतकरी लाँग मार्चचा आज चौथा दिवस, मुख्यमंत्र्यासोबतच्या बैठकीत तोडगा निघणार का?
Kisan Sabha Long March : किसान सभेच्या (Kisan Sabha) शेतकरी लाँग मार्चचा (long march) आज चौथा दिवस आहे. हा मोर्चा मुंबईच्या (Mumbai) दिशेने येत आहे.

Kisan Sabha Long March : किसान सभेच्या (Kisan Sabha) शेतकरी लाँग मार्चचा (long march) आज (15 मार्च) चौथा दिवस आहे. हा मोर्च मुंबईच्या (Mumbai) दिशेने येत आहे. सध्या हा मोर्चा इगतपुरी तालुक्यातील घाटन देवी गावात दाखल झाला आहे. घाटन देवीतून हा मार्च आज कसारा बायपासमार्गे पुढे प्रवास सुरु करणार आहे. दरम्यान, आज दुपारी किसान सभेच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होणार आहे. काल होणारी बैठक रद्द झाली होती. आता ही बैठक आज होणार असल्याची माहिती नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.
दरम्यान, किसान सभेच्या शेतकरी लाँग मार्चच्या मुद्यावरुन काल (14 मार्च) विधानसभेत गदारोळ झाला. विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. सध्या उन्हाचा चटका वाढला आहे. अशा उन्हात शेतकरी मुंबईच्या दिशेने येत आहेत. त्यांच्या मागण्यांसंदर्भात तात्काळ मार्ग काढावा अशी मागणी विरोधकांनी केली आहे. शेतमालाला योग्य भाव द्या, कांद्याला 600 रुपयांचं अनुदान द्या, नाफेडच्या माध्यमातून 2 हजार रुपये प्रतिक्विंटल दराने कांद्याची खरेदी करा. शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या, दुधाला FRP चं धोरण लागू करा, कसणाऱ्यांच्या ताब्यात असलेली वनजमीन त्यांच्या नावावर करा...या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा हा मार्च मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे.
आंदोलकांना मुंबईपर्यंत येण्याची वेळ पडणार नाही
दरम्यान, किसान सभेच्या शिष्टमंडळाची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होणार आहे. या बैठकीला विविध खात्यांचे सचिव उपस्थित राहणार असल्याची माहिती नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी काल विधानसभेत दिली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या मागण्यासंदर्भात सकारात्मक असल्याचे भुसे यावेळी म्हणाले. आंदोलकांना मुंबईपर्यंत येण्याची वेळ पडणार नसल्याचेही भुसे म्हणाले. दरम्यान, आमच्या जर मागण्या मान्य झाल्या तर आम्ही आहे त्या ठिकाणावरुन मोर्चा मागे घेऊ, असे किसान सभेच्या वतीने सांगण्यात आलं आहे.
पाच वर्षानंतर नाशिक ते मुंबई लाँग मार्च
पाच वर्षांपूर्वी शेतकऱ्यांनी नाशिकमधून लाँग मार्च काढला होता. विविध मागण्यांसाठी हजारो शेतकरी महिला भगिनी पायपीट करत नाशिकहून मुंबईला पोहोचले होते. कुणाचे पाय रक्तबंबाळ झाले होते तर कुणाचे पाय सुजलेले होते. एवढं करुन काहीही उपयोग झाला का? असं विचारण्याची वेळ आली आहे. कारण पुन्हा त्याच मागण्यांसाठी हे सर्व शेतकरी मजूर आणि आदिवासीबांधव पुन्हा एकदा डांबरी रस्त्यावरुन उन्हाचा चटका सहन करत मुंबईला निघाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
Nashik Long March : लाल वादळ इगतपुरी तालुक्यात दाखल, घाटनदेवी, कसारा घाटातून मुंबई गाठणार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
