एक्स्प्लोर
सांगलीच्या अग्रणी नदीने 25 वर्षांत प्रथमच धोक्याची पातळी ओलांडली, पुराचा धोका
अग्रणी नदी परिसरसतील नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अग्रणी नदीला आठवड्यात दुसऱ्यांदा पूर आला आहे. गेल्या 25 वर्षांत प्रथमच अग्रणीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
सांगली : सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागात दररोज मुसळधार पाऊस पडत आहे. या परतीच्या पावसाने कित्येक वर्षांनी वाहती झालेली या पूर्व भागातून वाहणारी अग्रणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यमुळे अग्रणी नदी परिसरसतील नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अग्रणी नदीला आठवड्यात दुसऱ्यांदा पूर आला आहे. गेल्या 25 वर्षांत प्रथमच अग्रणीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
पूर्व भागात दोन दिवस पाऊस झाला. त्यामुळे सिध्देवाडी तलाव ओव्हरफ्लो होऊन पाणी अग्रणी पात्रात दाखल झाले. आठवड्यात दुसऱ्यांदा नदीला पूर येऊन पाणी पात्राबाहेर गेले आहे. तासगाव तालुक्यातील सावळज, वज्रचौंडे, गव्हाण तसेच कवठेमहांकाळ तालुक्यातील मळणगाव हद्दीत अग्रणी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे.
गेल्या दोन दिवसांत तासगाव तालुक्याच्या पूर्व भागातील वायफळे, बिरणवाडी, सिध्देवाडी, दहिवडी, सावळज, अंजनी, गव्हाण, वडगाव, नागेवाडी या गावांना पावसाने झोडपून काढले आहे. काल सावळज परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अग्रणी नदी धोका पातळीवर वाहत आहे,तरी पाण्याला प्रचंड वेग असल्यामुळे हिंगणगाव, मोरगाव, देशिंग, धुळगाव परिसरातील नागरिकांनी सदर पुलावरून वाहतूक करू नये, अशा सूचना दिल्या आहेत.
दुसरीकडे खानापूर भागात करंजेहून रामनगरकडे येणारा रस्ता बंद झाला असून अग्रणी नदीच्या पुलावर जवळपास 4 ते 5 फूट पाणी साचले आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील हिंगणगाव, मोरगाव, अग्रण धुळगाव, मळणगाव येथील पूल पाण्याखाली गेले आहेत, तर लोणारवाडी येथील पूल वाहून गेला आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.
अग्रणी नदीला गेल्या रविवारी पूर आला होता, त्यामध्ये मोरगाव येथील पुलावरून दोघे वाहून गेले होते. गुरुवारी हिंगणगाव येथे दोन दुचाकी वाहून गेल्या. लोणारवाडी येथे गावाबाहेर असलेला खोतवाडी (कर्नाटक हद्द) येथे जाणारा मातीने बांधलेला पूल पाण्याच्या गतीने वाहून गेला. त्यामुळे या पुलावरून न जाण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement