गुगल ट्रान्सलेटरचा शेतकऱ्यांना फटका; इंग्रजीत नावांचा भलताच अर्थ
गुगल ट्रान्सलेटर मुळे सांगलीतील शेतकरी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या लाभापासून वंचित राहिले आहेत.
सांगली : सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गुगल ट्रान्सलेटरचा फटका बसला आहे. इंग्रजीत नावांचा भलताच अर्थ निघाल्याने वाळवा तालुकयातील बावची गावाच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या यादीमध्ये समाविष्ट असणाऱ्या तब्बल 628 शेतकऱ्यांना योजनेचा लाभच मिळाला नाही. त्यामुळे नावं दुरुस्त करण्यासाठी शेतकऱ्यांना चांगलीच धावपळ करावी लागत आहे.
वाळावा तालुक्यातील बावची गावात पंतप्रधान सन्मान योजनेमधून काही शेतकऱ्यांना दोन हजारांचा पहिला हफ्ता मिळाला. पण दुसरा हफ्ता मिळाला नाही. सदर प्रकरणी चौकशी केल्यानंतर हलगर्जीपणाचा प्रकार समोर आला. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ तर घेताच आला नाही. तसेच गुगल ट्रान्सलेटरमुळे स्वतःची चुकलेली नावं दुरुस्त करण्यासाठी कामं सोडून दिवसभर रांगेत उभे राहावे लागणार आहे. सदर प्रकार उघडकीस आल्यामुळे सध्या गावात शासकीय अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कामासंबधी चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत. या प्रकाराविषयी संबंधित अधिकाऱ्यांना विचारल्यानंतर, शेतकऱ्यांची नावाची यादी तात्काळ मागिवल्यामुळे संगणकावर भरताना नावात आणि स्पेलिंगमध्ये चुका झाल्याचे त्यांनी सांगितले.
गुगल आपली अनेक कामं सोपी करतं, एवढंच नाहीतर मराठी किंवा इंग्रजी कच्च असणाऱ्यांसाठी गुगलने भाषांतराची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्याद्वारे मराठीचं इंग्रजीत किंवा इंग्रजीचं मराठीत भाषांतरही करता येतं. मात्र, हे भाषांतर अगदीच प्राथमिक आणि क्वचित प्रसंगी अतिचुकीचं असू शकतं, याचा अनुभव आपल्यापैकी अनेकांनी घेतला आहेच. पण सांगलीमधल्या काही शेतकऱ्यांना या गुगल ट्रान्सलेटर भाषांतराचा मोठा फटका बसला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ मिळण्यासाठी इथल्या शेतकऱ्यांची नोंदणी संगणकात करण्यात आली. पण शेतकऱ्यांच्या मराठी नावांची संगणकात इंग्रजीत नोंदणी करताना झालेल्या स्पेलिंग मिस्टेकमुळे मोठा घोळ झाला. शेतकऱ्यांची नावंच या इंग्रजीकरणाच्या प्रक्रियेमध्ये बदलल्यामुळे ते शेतकरी लाभापासून वंचित राहिले आहेत.
सांगलीच्या बावची भागामध्ये काही शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेसाठी आपली नावनोंदणी केली होती. यासाठी आवश्यक ती कागदपत्र देखील सादर केली. पण नोंदणी करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्याने ही नावं थेट संगणकात टाकून गूगल ट्रान्सलेटरच्या माध्यमातून तिचं इंग्रजी भाषांतरच करून टाकलं. त्यामुळे उत्तम नावाचं बेस्ट असं भाषांतर झालं. भगवान नावाचं लॉर्ड असं तर, शरद नावाचं स्प्रिंग असं भाषांतर झालं. त्याशिवाय छाया नावाच्या शेतकरी महिलेचं नाव शॅडो असं नोंदवलं गेल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. आडनावांमध्ये सुतारचं कारपेंटर आणि कोष्टीचं स्पायडरमॅन असं भाषांतर झालं. त्यामुळे शेतकरी योजनेच्या लाभासाठी पात्र असून देखील त्यांना लाभ मिळालाच नाही. दरम्यान, हा सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना नावात दुरुस्ती करून घेण्यासाठी महा ई-सेवा केंद्रावर जाण्यासाठी सांगितलं आहे.
संबंधित बातम्या :
नवीन वर्षाच्या सुरुवातीला मोदी सरकारचं शेतकऱ्यांना गिफ्ट; खात्यांमध्ये जमा होणार 11 हजार कोटी रूपये
शिवरायांसोबत मोदींची तुलना : जनता बोलतेय, छत्रपतींच्या वारसदारांनी बोललंच पाहिजे : संजय राऊत
पंतप्रधान मोदींची छत्रपती शिवरायांशी तुलना, काँग्रेसकडून गुन्हा दाखल
राजकारणात अनेकजण निवडणुका हरतात, मात्र दुसऱ्यांना दोष देतात : नितीन गडकरी
गायीच्या पाठीवरुन हात फिरवल्यास नकारात्मक विचार नाहीसे होतात, यशोमती ठाकूरांचा अजब दावा