(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ravikant Tupkar : शेतकरी नेते रविकांत तुपकर मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय खलबतं?
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची आज भेट घेतली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविकांत तुपकर यांच्यासोबत उद्धव ठाकरेंनी चर्चा केली असून या भेटीला वेगळे महत्व आहे.
Ravikant Tupkar मुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी संपल्यानंतर आता नव्याने येणाऱ्या विधानसभा निवडणुकांचे (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) साऱ्यांना वेध लागले आहे. त्या अनुषंगाने स्थानिक पातळीपासून ते देश पातळीवर राजकीय घडामोडींना आता वेग आले आहे. सध्या जरी निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या नसल्या तरी त्या अनुषंगाने आचारसंहिता कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष आता मोर्चे बांधणीसाठी सज्ज झाला आहे. अशातच आता राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी होण्याची शक्यता आहे. कारण शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) आज भेट घेतली आहे.
जवळपास 25 जागांवर उमेदवार देण्याची तयारी
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविकांत तुपकर यांच्यासोबत उद्धव ठाकरेंनी चर्चा केली असून या भेटीला वेगळे महत्व असल्याचे बोलले जात आहे. बुलढाणा विधानसभा मतदारसंघात रविकांत तुपकर यांना महाविकास आघाडी कडून उमेदवारी मिळण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. तर आगामी काळात रविकांत तुपकर हे महाराष्ट्र दौरा करत असून जवळपास 25 जागांवर उमेदवार देण्याची त्यांनी तयारी दर्शवली आहे. लोकसभेला बुलढाणा मतदारसंघातून रविकांत तुपकर हे अपक्ष म्हणून उभे राहिले होते. यावेळी त्यांचा निवडणुकीत पराभव जरी झाला असला तरी त्यांनी जवळपास अडीच लाख मत घेतली होती. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मत विभाजन आणि नुकसान टाळण्यासाठी रविकांत तुपकर यांना सोबत घेण्याच्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडीत सकारात्मक चर्चा होत असल्याची माहिती आहे.
स्वाभिमानीने नातं तोडल्यानंतर रविकांत तुपकरांनी काढला नवा पक्ष
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हाकालपट्टी करण्यात आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात भूमिका घेऊन संघटनेची हानी केल्याबद्दल रविकांत तुपकर यांची हकालपट्टी करण्यात आल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून सांगण्यात आलंय. त्यानंतर रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी पुण्यात महाराष्ट्र क्रांतीकारी आघाडीची घोषणा केली होती. तर आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रविकांत तुपकर 25 जागा लढवणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. पुण्यातील कार्यकर्ता बैठकीत रविकांत तुपकरांनी (Ravikant Tupkar) ही घोषणा केली होती. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यात ते 6 जागा लढवणार आहेत. तर लवकरच राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा करणार असल्याची माहिती त्यावेळी त्यांनी दिली होती.
हे ही वाचा