भाजपचा राज्यात पहिल्यांदाच 'मध्यप्रदेश पॅटर्न', तीन नावं लिफाफ्यात बंद, एकाला मिळणार तिकीट
BJP Candidate List : विधानसभेच्या निवडणुकीसाठी त्या त्या ठिकाणच्या सर्व्हेचा आधार घेणाऱ्या भाजपने यंदा निरीक्षकांच्या माध्यमातून प्रत्येक मतदारसंघातून तीन नावं लिफाफ्यामध्ये बंद केल्याची माहिती आहे.
मुंबई : राज्यातील भाजप उमेदवाराचं भविष्य निरीक्षकांच्या लिफाफ्यात बंद झालं असून भाजपने पहिल्यांदाच राज्यात मध्यप्रदेश पॅटर्न राबवल्याची माहिती आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी तीन नावांना पसंती देण्यात आली असून त्यांची नावं ही वरिष्ठांना पाठवण्यात येणार आहेत. त्यानंतर त्यापैकी एकाला विधानसभेसाठी संधी दिली जाणार असल्याची माहिती आहे.
भाजपने राज्यातील प्रत्येक विधानसभेचा कल जाणून घेण्यासाठी बाहेरील निरीक्षक नेमले होते. या निरीक्षकांनी प्रत्येक विधानसभेत जाऊन पदाधिकाऱ्यांचं मतदान घेतलं आहे. त्यानुसार प्रत्येक विधानसभेतील पदाधिकाऱ्यांकडून तीन उमेदवारांची नाव बंद लिफाफ्यात घेण्यात आली आहेत. आता लवकरच लिफाफे उघडून कोणाला अधिक पसंती मिळाली हे पाहिलं जाणार आहे. त्यानुसार त्या त्या ठिकाणचा उमेदवार निवडला जाणार असल्याची माहिती आहे.
महायुतीमध्ये भाजप जास्त जागांसाठी आग्रही
महायुतीमध्ये भाजप जास्तीत जास्त जागांसाठी आग्रही असल्याची माहिती आहे. राज्यात भाजपला 155 पेक्षा जास्त जागा लढवण्यासाठी आग्रही आहे. त्याचवेळी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षाकडूनही जास्तीत जास्त जागा कशा पदरात पाडून घेतल्या जातील हे पाहिलं जातंय.
शिवसेनेनी मागितलेल्या जास्तीच्या जागांवर जिंकण्याची क्षमता असलेले उमेदवार कोणते? याबाबत भाजपकडून एकनाथ शिंदेना विचारणा केली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेच्या त्यांचे आमदार असलेल्या जागांच्या व्यतिरिक्त जास्त जागांच्या मागणीबद्दल भाजपकडून संबंधित मतदारसंघात जिंकण्याची क्षमता असलेले उमेदवार कोणते? याबाबात विचारणा केली जाणार असल्याची भाजपमधील सूत्रांची माहिती आहे.
सीटिंग आमदार असलेल्या जागेव्यतिरिक्त जागा हवी असल्यास जिंकण्याची क्षमता असलेला उमेदवार सांगा मगच मतदारसंघ घ्या अशी भाजपची स्ट्रेटेजी असल्याची माहिती आहे.
दरम्यान, महायुतीच्या जागावाटपाचा पेपर 80 टक्के सुटला आहे, उर्वरित 20 टक्के जागांचा प्रश्न चर्चा करून सोडवला जाईल अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भापजचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
ही बातमी वाचा :