नगरचा शेतकरी मालामाल, दोन महिन्यात वीस लाखांचा नफा
हंगाम नसतानाही चार एकरावर कलिंगडाची लागवड करुन तब्बल 60-62 दिवसांत तब्बल 100 टन उत्पादन घेतले आहे.
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील वीरगाव येथील विश्व हायटेक नर्सरीचे संचालक वीरेंद्र थोरात आणि वाटेकरी श्याम अस्वले यांनी वर्षभरात एकाच शेतात, एकाच बेडवर तीन पिके घेऊन यशस्वी होण्याची किमया साधलीय. विशेष म्हणजे हंगाम नसतानाही चार एकरावर कलिंगडाची लागवड करुन तब्बल 60-62 दिवसांत तब्बल 100 टन उत्पादन घेतले आहे. यात 3 लाख 20 हजार रुपयांचा खर्च करून 20 लाख रुपयांचा नफा मिळाला आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून कोविड आणि निसर्ग संकटांनी ग्रस्त असलेल्या शेतकर्यांना यातून प्रेरणा मिळणार आहे.
अकोले तालुक्यातील वीरगाव येथील वीरेंद्र थोरात यांनी विश्व हायटेक नर्सरीच्या माध्यमातून कायमच शेतकर्यांना नवनवीन प्रयोग करण्यास मार्गदर्शन केलेले आहे. याचा अनेक शेतकर्यांना फायदा झाला असून, यशस्वी उत्पादक झाले आहेत. त्यांनी वर्षभरात कमी कालावधीत येणारी पिके घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार चार एकर क्षेत्रावर मल्चिंग पेपरचा वापर करुन ऑक्टोबर महिन्यात कलिंगडाची लागवड केली. डिसेंबर महिन्यात हे पीक परिपक्व होऊन काढणीला आले. प्रतीएकर 25 टनाप्रमाणे चार एकरमधून 100 टन उत्पादन निघाले.
उत्तम गुणवत्ता व दर्जेदार असल्याने भारतातील कलिंगडाचे सर्वात मोठ्या व्यापार्याने थेट वीरगावमध्ये येऊन कलिंगड खरेदी केली. या पिकास प्रतीएकर 80 हजार रुपयांप्रमाणे 3 लाख 20 हजार रुपयांचा खर्च आला. व्यापार्याकडून 24 रुपये प्रतिकिलोचा भाव मिळाल्याने 24 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. यातून खर्च वगळता 20 लाख 80 हजार रुपयांचा नफा केवळ दोन महिन्यात मिळाला आहे. या यशामागे सूक्ष्म व्यवस्थापन, सिंचन, तंत्रज्ञान आणि वातावरणाचा अचूक अंदाज घेत केलेली औषध फवारणी कारणीभूत असल्याचे श्याम अस्वले यांनी सांगितले.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
संबंधित बातम्या :
Fertilizer : शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, रब्बी हंगामाची पेरणीच्या तोंडावर खतांच्या किंमतीत वाढ