(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur : अडीच हजार भरले तरी वर्दी मिळेना; शेकडो जवानांचे प्रशिक्षण केंद्राबाहेरच आंदोलन
वर्दी घालून आपल्या गावी परतण्याचे स्वप्न हे प्रशिक्षणार्थी बघत असतात. मात्र प्रशिक्षण पूर्ण करुन आणि 'पासिंग आउट परेड' पर्यंतही वर्दी न मिळाल्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांमध्ये रोष होता.
Nagpur News : पंचेचाळीस दिवसांच्या प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आणि वर्दीसाठी अडीच हजार रुपये भरून ही महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी वर्दी न दिल्यामुळे आज नागपुरात शेकडो जवानांनी आंदोलन केले. नागपुरातील प्रतापनगर येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या (Police Training Center RPTS) बाहेर हे आंदोलन झाले.
महाराष्ट्र सुरक्षा दलाचे अधिकारी गरीब आणि शेतकरी कुटुंबातील तरुणांची फसवणूक करत असल्याचे आरोप महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांनी यावेळी केले. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून महाराष्ट्र राज्य सुरक्षा दलासाठी राज्यभरातून तरुणांची निवड केली जाते. त्यांना राज्यातील विविध पोलीस प्रशिक्षण केंद्रात 45 दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते. नागपूरच्या ( Nagpur) प्रतापनगर भागातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात आज महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या शेकडो जवानांचे प्रशिक्षण पूर्ण झाले. प्रशिक्षणार्थ्यांनी सांगितल्याप्रमाणे सुमारे 700 जणांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे.
प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्यांची आज 'पासिंग आउट परेड' होती. मात्र, 'पासिंग आउट परेड' पर्यंत ही या जवानांना त्यांची वर्दी न मिळाल्यामुळे त्यांच्यात रोष निर्माण झाला. त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारले. मात्र, त्यांना समाधानकारक जबाब न मिळाल्यामुळे घरी परतण्यापूर्वी काही वेळ आंदोलन करत आपला रोष व्यक्त केला. दरम्यान, या विषयावर महाराष्ट्र सुरक्षा दलाचे अधिकारी काहीही बोलायला तयार नाही.
वर्दी म्हणजे अभिमान...
महाराष्ट्र राज्य सुरक्षा दलासाठी निवड झाल्यानंतर प्रशिक्षणार्थी जेव्हा आपल्याला गावाला परत जातो त्यावेळेस गावकरी, कुटुंबिय मित्रपरिवारांकडून जंगी स्वागत करण्यात येते. तसेच वर्दी घालून आपल्या गावी परतण्याचे स्वप्न हे प्रशिक्षणार्थी बघत असतात. मात्र प्रशिक्षण पूर्ण करुन आणि 'पासिंग आउट परेड' पर्यंतही वर्दी न मिळाल्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांमध्ये रोष होता. यावेळी आम्हाला वर्दी द्या आणि जाऊ द्या, अशी भूमिका सर्वांची होती. मात्र तरीही महाराष्ट्र सुरक्षा दलाचे अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याने रोष व्यक्त केला. यासंदर्भात माध्यमांनी अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा अधिकाऱ्यांनी बोलण्यास थेट नकार दिला. तसेच प्रशिक्षणार्थ्यांनाही समाधानकारक उत्तर दिले नाही.
महत्त्वाची बातमी