(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नागपूर जिल्हा परिषदेत कोट्यवधींचा पेंशन घोटाळा; महिला कर्मचाऱ्याकडून मृतांच्या नावाची रक्कम मित्र, नातेवाईकांच्या खात्यात
घोटाळ्याची व्याप्ती कोट्यवधींच्या घरात असल्याचा अंदाज आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून महिला कर्मचारी हे रजेवरही गेली आहे. दुसऱ्या कर्मचाऱ्याकडे तिचे काम वर्ग करण्यात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
Nagpur News : नागपूर जिल्हा परिषदेत एका कनिष्ठ महिला लिपिकाने मृतांच्या नावाची पेंशन जवळच्या मंडळींच्या बँक खात्यात वळती करुन कोट्यवधींचा घोटाळा केल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे जिल्हा परिषदेचे (Nagpur ZP CEO) मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकरांकडून गैरव्यवहारांना आळा घालण्याचा प्रयत्न सुरु असताना दुसरीकडे घोटाळे समोर येत आहेत.
जिल्हा परिषदेच्या इतिहासामधील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा घोटाळा (Biggest Scam In Nagpur ZP) असल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात आहे. या महिला कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करुन चौकशी समिती गठित करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरु असल्याचे सांगण्यात येते. नेवारे असे महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार या महिलेकडे शिक्षण विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पेंशनची प्रकरणे हाताळण्याचे काम होते. सेवानिवृत्तीनंतर मृत पावलेले कर्मचारी 'हयात' (जिवंत) असल्याचे दाखवत त्यांची पेंशन आपल्या जवळील व्यक्ती, मित्र, नातेवाईक यांच्या खात्यात वळती करत होत्या.
हा प्रकार गेल्या सात ते आठ वर्षांपासून सुरु असून घोटाळ्याची रक्कम कोट्यवधींच्या घरात असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार गेल्या अनेक महिन्यांपासून महिला कर्मचारी हे रजेवरही गेली आहे. त्यामुळे तिचे काम दुसऱ्या कर्मचाऱ्याकडे वर्ग करण्यात आले. संबंधित कर्मचाऱ्याला मोठा संशय आला. त्यामुळे हे प्रकरण समोर आले आहे.
बीडीओंच्या भूमिकेवरही संशय!
संबंधित महिला अनेक वर्षांपासून एकाच पंचायत समितीमध्ये कार्यरत आहे. नियमानुसार एका कर्मचाऱ्याकडे तीन ते पाच वर्षापेक्षा जास्त काळ एक टेबल (काम) ठेवता येत नाही. तरीही या कर्मचाऱ्यावर बीडीओकडून कारवाई करण्यात आली नाही. तसेच या महिला कर्मचाऱ्याचा रजेचा अर्जही नसल्याचे सांगण्यात येत आहे. असे असताना बीडीओंकडून कुठलेही पाऊल उचलण्यात आले नाही. त्यामुळे त्यांच्या भूमिकेवर शंका व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भात बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी माध्यमांशी बोलणे टाळले.
सीईओ म्हणतात..
या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मोठा गैरव्यवहार असल्याचे शिक्षण विभागाकडून आलेल्या अहवालातून दिसते. या अहवालाच्या आधारे संबंधित महिला कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून चौकशी समितीही गठित करण्यात आली. समिती अहवाल आल्यावर पुढील कारवाई निश्चित करण्यात येणार असल्याचे सीईओ योगेश कुंभेजकर यांनी सांगितले.
महत्त्वाची बातमी