Pratap Sarnaik : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक अडचणीत; ईडीकडून11.35 कोटींची संपत्ती जप्त
ED attaches assets of Pratap Sarnaik : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्याशी संबंधित 11.35 कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे.
ED attaches assets of Pratap Sarnaik : शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांची 11.35 कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. NSEL घोटाळा प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे. ईडीने ठाण्यातील दोन फ्लॅट जप्त केले आहेत. मनी लाँड्रिंग प्रतिबंध कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीच्या या कारवाईनंतर शिवसेना आणि भाजप यांच्यात सुरू असलेले आरोप-प्रत्यारोपाला आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
सन 2013 मध्ये एनएसईएल घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने एफआयआर दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास ईडीने ताब्यात घेत चौकशी सुरू केली. एनएसईएल घोटाळा प्रकरणात संचालकांसह 25 जणांविरोधात मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यानुसार चौकशी सुरू झाली होती. या घोटाळ्यातील गुंतवणुकीची रक्कम आरोपींनी रिअल इस्टेट, थकीत कर्जाची परतफेड आणि इतक कामांसाठी बेकायदेशीरपणे वापरली असल्याचे समोर आले. जवळपास 13000 गुंतवणूकदारांच्या 5600 कोटींच्या रक्कमेचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे.
ईडीने केलेल्या तपासानुसार, आस्था ग्रुपकडे एनएसईएलची 242.66 कोटी थकबाकी रुपयांची थकबाकी होती. आस्था ग्रुपने सन 2012-13 या कालावधीत 21.74 कोटी रुपये विहंग आस्था हाऊसिंग प्रोजेक्टसाठी दिले. त्यापैकी 11.35 कोटी रुपये विहंग एंटरप्राइजेस आणि विहंग इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लिमिटेडकडे वळते करण्यात आले. या दोन्ही कंपन्या प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित असल्याची माहिती ईडीने दिली.
कागदपत्रांची तपासणी, मिळालेली माहिती आदींच्या आधारे ईडीने ठाणे येथील दोन फ्लॅट आणि काही जमिनीचा काही भाग ईडीने जप्त केला आहे. ईडीने जप्त केलेल्या रक्कमेची किंमत ही 11.35 कोटी रुपये असून पीएमएलए कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
आस्था ग्रुपने 10.50 कोटींची रक्कम योगेश देशमुख यांना दिली होती. एवढ्या रक्कमेची मालमत्ता याआधीच जप्त करण्यात आली असल्याचे ईडीने म्हटले आहे. एनएसईएल घोटाळा प्रकरणात आतापर्यंत एकूण 3242.67 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यावर ईडीची कारवाई
ई़डीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर कारवाई केली. पुष्पक बुलियन या कंपनीशी संबंधित एका प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. जप्त केलेली ही मालमत्ता तब्बल 6.45 कोटी रुपयांची आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तामध्ये नीलांबरी प्रोजेक्ट्समधील 11 सदनिकांचा समावेश आहे. या सदनिका साईबाबा गृहनिर्मिती कंपनीच्या नावावर आहेत. साईबाबा गृहनिर्मिती ही कंपनी श्रीधर माधव पाटणकर यांच्या मालकीची आहे. श्रीधर पाटणकर हे रश्मी ठाकरेंचे भाऊ आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या: