तरुणाची सटकली ...म्हणून डायरेक्ट बाईकच पेटवली
तरुणाने शोरुम समोरच अमहदनगर-मनमाड रस्त्यावर आपली दुचाकी पेटवून दिली. घटनेची माहिती मिळताच राहाता पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले होते. अग्निशमन दलाच्या मदतीने आग विझवण्यात आली. मात्र तोपर्यंत गाडी पूर्णतः जळून खाक झाली.
शिर्डी : तरुणाने शोरुमसमोरच नवीन घेतलेली दुचारी पेटवून दिल्याचा प्रकार शिर्डीच्या जवळील राहाता येथे समोर आला आहे. नवीन घेतलेल्या दुचाकीचे मशीन खराब असल्याची चार वेळा तक्रार देऊनही शोरुमकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने हताश झालेल्या तरुणाने हे टोकाचं पाऊल उचललं आहे.
पुणतांबा येथील प्रमोद सुदाम निर्मळ या तरुणाने राहाता येथील भन्साळी शोरुममधून दोन महिन्यांपूर्वी होंडा युनिकॉर्न ही 94,000 रुपये किंमतीची दुचाकी खरेदी केली होती. मात्र मशिन वारंवार खराब होत असल्याने त्याने आतापर्यंत चार वेळेस गाडी शोरुमध्ये दाखवली होती.
मात्र शोरूमकडून बाईक योग्यरित्या दुरुस्त केली जात नव्हती. आज देखील तो दुचाकी घेवून शोरुमला आला होता. मात्र शोरुमकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने तो हताश झाला होता. अखेर वैतागलेल्या प्रमोदने शोरुम समोरच अमहदनगर-मनमाड रस्त्यावर आपली दुचाकी पेटवून दिली. त्यामुळे वाहतूकही काहीवेळ खोळंबली होती.
रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी ही पेटलेली गाडी बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच राहाता पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले होते. अग्निशमन दलाच्या मदतीने आग विझवण्यात आली. मात्र तोपर्यंत गाडी पूर्णतः जळून खाक झाली.