डॉ. सुदाम मुंडे बेकायदेशीर हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग निदान, गर्भपात करायचा का? बीडच्या आरोग्य विभागाकडून तपास सुरू
सुदाम मुंडे याच्या एकूण बेकायदेशीर हॉस्पिटल प्रकरणी तीन वेगवेगळ्या विभागाकडून तपासणी सुरू आहे. त्यात गोळ्या औषध कुठून आणले आणि त्याचा पुरवठा कुणी केला हे तपासण्याचे काम अन्न व औषध प्रशासन करत आहे.

बीड : स्त्री भ्रूण हत्या प्रकरणातील आरोपी डॉ. सुदाम मुंडे याला दहा वर्षांची शिक्षा झाल्यानंतर उच्च न्यायालयाने जामीन दिल्यानंतर तो परळीमध्ये आला होता. परळीमध्ये तो पुन्हा एकदा अवैधरित्या हॉस्पिटल चालवायचा. या बेकायदेशीर हॉस्पिटलवर 5 सप्टेंबर रोजी आरोग्य विभागाने छापा टाकला होता. या प्रकरणी सुदाम मुंडे सध्या परळी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कोठडीत आहे.
आरोग्य विभागाने सुदाम मुंडे याच्या बेकायदेशीर हॉस्पिटलवर छापा टाकल्यानंतर या ठिकाणी कोरोना सदृश रुग्णावरती उपचार चालू असल्याचे आढळून आले होते. विशेष म्हणजे या ठिकाणी काही गर्भलिंग निदान आणि गर्भपातासाठी लागणारी साधन सामुग्रीसुद्धा आढळून आली होती. त्यामुळे आरोग्य विभागाने सुदाम मुंडे पुन्हा एकदा गर्भपात आणि गर्भलिंग निदान करतोय का हा तपास सुरू केला आहे.
सुदाम मुंडे याच्या एकूण बेकायदेशीर हॉस्पिटल प्रकरणी तीन वेगवेगळ्या विभागाकडून तपासणी सुरू आहे. त्यात गोळ्या औषध कुठून आणले आणि त्याचा पुरवठा कुणी केला हे तपासण्याचे काम अन्न व औषध प्रशासन करत आहे. याप्रकरणी परळी शहरातील एका मेडिकल चालकाला औषध विभागाने नोटीस बजावली आहे.
महत्वाचा तपास करण्याची जबाबदारी आरोग्य विभागवर आहे. कारण गर्भलिंगनिदान आणि गर्भपात प्रकरणी तपास आरोग्य विभाग करणार आहे आणि याच प्रकरणी आरोग्य विभागाने एका सोनोग्राफी सेंटर चालकाला चौकशीसाठी बोलावले होते. सुदाम मुंडे याच्या हॉस्पिटलवर छापा टाकल्यानंतर याठिकाणी सोनोग्राफी मशीन आढळून आले नव्हते. त्यामुळे या संदर्भात तपास करणे आरोग्य विभागासमोर आव्हान असणार आहे.
एका सोनोग्राफी सेंटरचे रेकॉर्ड तपासल्यानंतर काही गरोदर महिलांची चौकशी आरोग्य विभागाने केली. यात एक गर्भवती महिला सध्या गर्भवती आहे. मात्र दुसर्या एका गर्भवती महिलेचा सात आठवड्यात शासकीय हॉस्पिटलमध्ये गर्भपात झाल्याचं आढळून आला आहे. इतर सुद्धा काही महिलांचे या संदर्भामध्ये आरोग्य विभागाकडून चौकशी सुरू आहे. अर्थात या सगळ्या तपासाची जबाबदारी परळी पोलिसांवर आहे आणि या संदर्भामध्ये हा बेकायदेशीर दवाखाना चालवण्यासाठी सुदाम मुंडे याला कोण व कशा प्रकारे मदत करत होता याची तपासणी पोलिसांनी करायला सुरुवात केली आहे. यामध्ये आतापर्यंत एकूण आठ जणांचे जवाब पोलिसांनी नोंदवले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
