Dhule : धुळ्यातील दोन तरुणांची कमाल, अत्याधुनिक वेबसाईट निर्माण करुन शाळेचं काम केलं सोपं
धुळे येथील श्री विलेपार्ले केळवणी मंडळाच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या दोन विद्यार्थ्यांनी शाळेची एक वेबसाईट तयार केली असून यामुळे शाळेचे कागदोपत्री कामकाज सोपं झालं आहे.
धुळे : धुळ्यातील श्री विलेपार्ले केळवनी मंडळाच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या महाविद्यालयातील तृतीय वर्षाच्या सहाव्या सत्रात शिकत असलेल्या युवराज जाधव आणि भूषण संजय मोरे या दोन विद्यार्थ्यांनी एसव्हीकेएम शाळेसाठी एक वेबसाईट तयार केली आहे. यामुळे या शाळेचे कामकाज करणं शिक्षकांना अत्यंत सोपं झालं आहे. अत्यंत कमी वेळात आणि कमी खर्चात ही वेबसाइट तयार केल्याबद्दल या विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निलेश साळुंखे तसेच विभाग प्रमुख डॉ. भूषण चौधरी, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुनंदा मेनन यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
शाळेसाठी किंवा अन्य कोणत्याही संस्थेसाठी वेबसाईट तयार करण्यासाठी आता नाशिक मुंबई, पुणे येथे जाण्याची गरज उरली नाही. धुळ्यातील या दोन तरुणांनी स्वतःचे स्टार्टअप सुरु करून कोरोनाच्या अनिश्चित काळात तरुणांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वेबसाईटचे वैशिष्ट्य म्हणजे शाळेतील शिक्षक आपले दैनंदिन कामकाज खूप सरळ आणि सोप्या पद्धतीने करु शकणार आहेत.
विद्यार्थ्यांकडून भरुन घेण्यात आलेल्या एका अर्जाच्या मदतीने संबंधित विद्यार्थ्यांची माहिती या वेबसाईटमध्ये संकलित केली जाणार आहे. यासोबत शाळेमधील शिक्षकांची माहिती देखील या वेबसाईटमध्ये संकलित करणे सोपं जाणार आहे. यासोबत विद्यार्थ्यांचा शालेय दाखला बोनाफाईड प्रमाणपत्र रिपोर्ट कार्ड यासह अन्य माहिती पीडीएफ स्वरूपात संकलित करून त्यावर शिक्षकांची आणि मुख्याध्यापकांची डिजिटल स्वाक्षरी करता येणार आहे. यासोबत नवीन माहिती देखील संकलित करणे आणि काढून टाकणे शिक्षकांना आणि कर्मचाऱ्यांना सोपे जाणार आहे.
या वेबसाईटचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे संकलित करण्यात आलेली सगळी माहितीची आकडेवारी कुठेही आणि कोणत्याही वेळी पाहता येणार आहे. यासह नवीन तंत्रज्ञान या तरुणांनी विकसित केले आहे. या तरुणांनी धुळ्यात टेक डेस्टीनेशन सॉफ्टवेअर हब या नावाने आपले माहिती आणि तंत्रज्ञानाचे कौशल्य वापरून स्वतःचे स्टार्टअप सुरु केले असून वेबसाईट सह मोबाईल ॲप्लिकेशन तयार करण्याचे काम आता धुळ्यातच सुरु झालं आहे. यामुळे दैनंदिन कामकाज करणे सोपे होणार आहे.
महत्वाच्या बातम्या :