Devendra Fadnavis : शाळेत बॅक बेंचर, शांत अन् लाजाळू, पण मित्रांसाठी काहीही करायला तयार; 'विद्यार्थी' देवेंद्र फडणवीस कसे होते?
Devendra Fadnavis School Story : देवेंद्र फडणवीस शाळेत असताना त्यांचे वडील आमदार होते. पण त्याचा कधीही बडेजावपणा न करता राहणीमान नेहमी साधी ठेवली.
नागपूर : शाळेत लास्ट बेंचवर बसणाऱ्यांना बॅक बेंचर म्हणून चिडवले जाते. मात्र, शाळेत नेहमीच लास्ट बेंच वर बसणाऱ्या एका शांत आणि लाजाळू मुलाची महाराष्ट्रातील सर्वात पहिल्या खुर्चीवर बसण्यासाठी निवड होत असेल तर तुम्ही काय म्हणणार? शाळेत विशिष्ट कारणाने नेहमीच सर्वात अखेरच्या बेंचवर बसणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत हेच घडत आहे. शाळेत नेहमीच शांत आणि लाजाळू असणारे देवेंद्र फडणवीस आता राज्याचे मुख्यमंत्री बनणार आहेत हे नक्की झालंय.
शाळेत नेहमीच शांत आणि लाजाळू असणारे देवेंद्र फडणवीस एक आक्रमक राजकारणी कसे बनले. शाळेत कसे घडले देवेंद्र फडणवीस? फडणवीसांची मित्रांमध्ये एकी घडविण्याची क्षमता शालेय जीवनात कशी भक्कम होती? ते शाळेत कोणत्या खोड्या करायचे? या सर्वांबद्दल त्यांच्या वर्ग शिक्षिका आणि शाळेतील इतर शिक्षकांकडून माहिती मिळाली आहे.
उंची जास्त असल्याने मागे बसावे लागायचे
नागपूरच्या शंकर नगर चौकावरील साउथ इंडियन एजुकेशन सोसायटीच्या सरस्वती विद्यालयातून देवेंद्र फडणवीस यांचे शालेय शिक्षण झाले. शाळेतील तळ मजल्यावरच्या वर्गात शेवटून दुसऱ्या बाकावर बसत महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांनी आठव्या, नवव्या आणि दहाव्या वर्गातील वेगवेगळे विषय आत्मसात केले होते. मात्र, फडणवीस अभ्यासात ढ होते म्हणून त्याना अखेरच्या बाकावर बसावे लागत नव्हते. तर लहानपणी देवेंद्र फडणवीस यांची उंची ही जास्त होती. इतर मुलांच्या तुलनेत ते जास्त उंच असल्याने त्यांना शेवटच्या बाकावर बसावे लागायचे.
जास्त हुशार नसले तरी मेहनती अन् खोडकर
शाळेत अत्यंत शांत, लाजाळू आणि कधी कधीच बोलणारे देवेंद्र फडणवीस सुरुवातीपासूनच त्यांच्या सर्व शिक्षकांना सर्वांपासून वेगळे वाटायचे आणि म्हणून आज सुमारे 40 वर्षानंतरही त्यांच्या तेव्हाच्या वर्ग शिक्षिका सावित्री सुब्रमण्यम यांना फडणवीसांची प्रत्येक गोष्ट आठवते. वर्ग शिक्षिकेच्या मते देवेंद्र यांना जेवढे विचारले जायचे तेवढेच ते बोलायचे.
सावित्री सुब्रमण्यम यांच्या मते, ते अभ्यासात खूप हुशार नसले तरी नेहमीच मेहनतीने देवेंद्र फडणवीस समाधानकारक गुण मिळवायचे. मात्र मित्रांचा संघटन घडवून आणण्यात, वर्गाची एकी जपण्यात फडणवीसांचा हातखंडा होता. शाळेत होळीच्या वेळेला खोडी केल्यानंतर फडणवीसांसह संपूर्ण वर्गाने सामूहिक शिक्षा भोगली होती. मात्र ती खोडी कोणी केली आहे हे शिक्षकांना कळू दिले नव्हते अशी आठवणही वर्ग शिक्षिकांनी सांगितली.
शाळेतील सर्वच कामांमध्ये हिरीरीने सहभागी होणाऱ्या देवेंद्र यांना पीटीचा वर्ग (शारीरिक शिक्षणाचे वर्ग) आवडले नाहीत. त्यामुळे पीटीमधून गायब होण्यातही देवेंद्र यांचा हातखंडा होता आणि त्यासाठी त्यांना अनेक वेळेला पीटीच्या शिक्षकाकडू शिक्षाही मिळायची.
वडील आमदार, तरीही साधी राहणीमान
विशेष म्हणजे जेव्हा देवेंद्र फडणवीस त्यांचे शालेय शिक्षण घेत होते त्याच काळी त्यांचे वडील गंगाधरराव फडणवीस नागपुरातून विधान परिषदेचे आमदार होते. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी कधीही मित्रांमध्ये आमदाराचा मुलगा असा बडेजाव केला नाही. पायी शाळेत जाणे, पायात साधी स्लीपर, खांद्यावर शबनम बैग आणि कुरळे केस अशीच देवेंद्र फडणवीस यांची राहणी होती. मात्र मित्रांसाठी कोणताही धोका पत्करण्याची आणि अडचणीतील मित्रांना साथ देण्याचे त्यांच्या शालेय जीवनातील काही प्रसंग वर्ग शिक्षिकेला आज ही आठवतात.
शिक्षिकेच्या मते, आजचे मुख्यमंत्री आणि त्यांचे तत्कालीन मित्र कधीच सुट्टीचे अॅप्लिकेशन वडिलांच्या किंवा पालकांच्या स्वाक्षरीने आणत नव्हते. ते स्वतःच एकमेकांचे पालक बनून सह्या करायचे. ही बाब तेव्हा ही शिक्षिकेला जाणवायची. मात्र मुलं फक्त एकमेकांना वाचवण्यासाठी ही खोडी करत असल्याचे माहीत असल्याने त्यांनी ही कधीच हस्तक्षेप केले नाही.
आजही शाळेला भेट देतात
दरम्यान, दहावीनंतर शाळेतून बाहेर पडल्यानंतरही देवेंद्र फडणवीसांचा शाळेशी संबंध कायम आहे. शाळेच्या अनेक छोट्या मोठ्या समारंभात ते शाळेत येतात. शाळेला मदतही करतात. खास बाब म्हणजे त्यांच्या 10 वी च्या तुकडीला पास होऊन 25 वर्ष झाले होते. तेव्हाही सर्व जुने वर्ग मित्र वर्गात आले असताना लास्ट बेंचर देवेंद्र फडणवीसांने आपली शेवटचीच बेंच धरली होती. तसेच एक वडील या नात्याने आपल्या लेकीला शाळेच्या कार्यक्रमात आणून आपली शाळाही दाखविली होती.
सव्वाशे वर्षे जुन्या सरस्वती शाळेतला एक विद्यार्थी आज पुन्हा एकदा राज्याचा मुख्यमंत्री झाला असून शाळेतील प्रत्येकाला त्याचा आनंद आहेच. आता मुख्यमंत्री म्हणून त्यांचा गुणवंत विद्यार्थी शाळेत पुन्हा केव्हा येतो याची प्रतीक्षा ही सर्वाना आहे.